मुंबई : मुंबईतील अनुदानित व विनाअनुदानित मराठी शाळांच्या इमारतींना मालमत्ता करातून पूर्ण सूट देण्याची मागणी प्रभाग क्र 54 चे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नगरसेवक अंकित सुनिल प्रभू यांनी महापालिका आयुक्तांना पत्रादवारे केली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनुदानित व विनाअनुदानित तत्त्वावर चालणाऱ्या मराठी शाळांवर पडणारा आर्थिक ताण कमी करण्यासाठी आणि शाळा बंद पडण्यापासून वाचविण्यासाठी शैक्षणिक कामकाजासाठी वापरण्यात येणाऱ्या जागांना मालमत्ता करातून (Property Tax) पूर्ण सूट देण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक अंकित सुनील प्रभु यांनी महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे.
आपल्या पत्रात नगरसेवक अंकित सुनिल प्रभू यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनुदानित व विनाअनुदानित मराठी शाळा विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण काम करत आहेत, असे सांगत ते पुढे म्हणाले,” महापालिकेच्या सध्याच्या धोरणानुसार शैक्षणिक हेतूसाठी वापरण्यात येणाऱ्या मालमत्तांवर केवळ अंशतः (Partially) करसूट दिली जाते, शाळांचा वाढता देखभाल खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन, पायाभूत सुविधांचा खर्च आणि इतर प्रशासकीय वाढत्या खर्चामुळे शैक्षणिक संस्थांवर मोठा आर्थिक ताण निर्माण होत आहे. याचा अप्रत्यक्ष फटका विद्यार्थ्यांच्या फी वाढीच्या रूपाने पालकांना बसत असून, अनेक शाळा आर्थिक अडचणींमुळे बंद पडण्याच्या स्थितीत आल्याचे नगरसेवक अंकित सुनिल प्रभू यांनी पत्रात म्हटले आहे
ही गंभीर परिस्थिती आणि पालकांची होणारी अडचण लक्षात घेऊन शाळा इमारतींमधील वर्ग खोल्या, ग्रंथालये, प्रयोगशाळा आणि प्रशासकीय कार्यालये यांसारख्या शैक्षणिक भागांना मालमत्ता करातून पूर्ण सूट देण्यात यावी, अशी मागणी करीत मुंबईतील मराठी शाळांवरचा मालमत्ता कराचा आर्थिक भार कमी झाल्यास शाळा व्यवस्थापनाला दिलासा मिळेल आणि त्यामुळे होणाऱ्या अवाजवी शुल्कवाढीस प्रभावीपणे आळा बसेल. याचा थेट फायदा आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मध्यमवर्गीय पालकांना होऊन त्यांच्या मुलांचे शिक्षण सुलभ होईल. बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या मुंबईतील मराठी शाळांना नवसंजीवनी देण्यासाठी महापालिकेने यावर सकारात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. महापालिका आयुक्तांनी या प्रस्तावाच्या अंमलबजावणीवर तातडीने विचार करून अहवाल सादर करावा, अशी आग्रही विनंती अंकित सुनील प्रभु यांनी महापालिका आयुक्तांना पत्राच्या माध्यमातून केली आहे.




