मुंबई, दि. ५ : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या केंद्रीय मंत्रीपदाच्या दहा वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीनिमित्त १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशच्या वतीने प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, मंत्री आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पत्रकार परिषदेला राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कासारे आणि प्रदेश सरचिटणीस विवेक पवार उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत रामदास आठवले यांनी सलग तिसऱ्यांदा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून काम करत विक्रमी दहा वर्षांची सेवा पूर्ण केली आहे. या ऐतिहासिक कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित सोहळ्यास मुंबई-ठाणे परिसरातील आंबेडकरी समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाच्या नेत्यांनी केले.



