ताज्या बातम्या

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बची खोटी धमकी; अज्ञाताविरोधात गुन्हा, आरोपीचा शोध सुरू

नवी मुंबई, दि. ३१ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याची खोटी धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध सुरू आहे.
२४ जून रोजी विमानतळाच्या अधिकृत ई-मेलवर विमानतळ परिसरात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा संदेश प्राप्त झाला होता. या प्रकरणाचा तांत्रिक आणि सायबर तपास केल्यानंतर आरोपीने स्वतःची ओळख लपवण्यासाठी तमिळनाडूतील एका व्यक्तीचा मोबाईल क्रमांक तसेच बनावट ई-मेल आयडीचा गैरवापर केल्याचे उघड झाले. त्यानंतर २९ जुलै रोजी भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
दरम्यान, यापूर्वीही विमानतळाला अशाच प्रकारच्या धमक्या मिळाल्या होत्या. २५ जून रोजी रासायनिक बॉम्ब ठेवल्याची धमकी, तर २९ जून रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून विमानतळ उडवून देण्याची आणि विमान अपहरणाची धमकी देण्यात आली होती.
प्रत्येक वेळी सुरक्षा यंत्रणा, बॉम्बशोधक व नाशक पथक तसेच श्वान पथकाने विमानतळ परिसराची कसून तपासणी केली. मात्र, सर्व धमक्या खोट्या असल्याचे तपासातून स्पष्ट झाले. या प्रकारामुळे सुरक्षा यंत्रणांवर अतिरिक्त ताण निर्माण होत असून, अशा खोट्या धमक्या देणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Scroll to Top