ताज्या बातम्या

उंडाळे पुलावर संरक्षक कठड्यांचा अभाव; अपघाताचा धोका वाढला, सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात

कराड(प्रताप भणगे) : कराड तालुक्यातील पाचवड फाटा–उंडाळे मार्गावरील उंडाळे पुलावर अद्यापही पुरेशा संरक्षक कठड्यांची व्यवस्था नसल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पुलावर यापूर्वी अनेक लहान-मोठे अपघात घडल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे असून, वेळीच उपाययोजना न झाल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या मार्गावर दिवस-रात्र अवजड वाहने, शालेय बस, प्रवासी वाहने तसेच दुचाकींची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. मात्र पुलाच्या दोन्ही बाजूंना मजबूत संरक्षक कठडे नसल्याने वाहनचालकांचा क्षणभर ताबा सुटल्यास वाहन थेट पुलाबाहेर जाण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे हा पूल अपघातप्रवण ठरत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन पुलावर मजबूत लोखंडी संरक्षक कठडे, परावर्तक (रिफ्लेक्टर्स), इशारा फलक, वेगमर्यादा दर्शविणारे फलक तसेच इतर आवश्यक सुरक्षा उपाययोजना त्वरित राबवाव्यात, अशी मागणी केली आहे.
“मोठी दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा संभाव्य अपघात टाळण्यासाठी आधीच सुरक्षिततेची प्रभावी व्यवस्था करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे,” अशी भूमिका स्थानिक नागरिकांनी मांडली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाची तातडीने पाहणी करून आवश्यक सुरक्षाविषयक कामे हाती घ्यावीत, अशी मागणी परिसरातून जोर धरत आहे.

Scroll to Top