
कुडाळ(अजित जगताप) : शांतता प्रिय असलेल्या जावळीमध्ये पुन्हा एकदा राजकीय संघर्ष पाहण्यास मिळाला आहे. अर्थात हे राजकीय पटलावर कार्यरत असणाऱ्या जावळीकरांना फारसं नवीन नाही. जावळी तालुक्यात विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अनुषंगाने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी ठराव घेतले जात आहेत. बँकेसाठी मतदानाचा अधिकार घेण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यावर आहे. प्रत्यक्षात मतदानादिवशी राज्य राखीव पोलीस दलाची कंपनी बोलवावी लागेल. असे चित्र दिसत आहे. त्यामुळे निवडणुका बिनविरोध व्हावे असे आतापासूनच जावळीकर प्रार्थना करत आहेत.
गुरुवार दिनांक ३० जुलै रोजी दुपारी आखाडे तालुका जावळी येथील सोसायटीच्या एका ठरावामुळे चांगलेच रान पेटले होते. कार्यकर्त्यांना आवर घालण्यासाठी पोलिसांची दमछाक झाली. एरवी ही गोष्ट एखादा गावात घडले असती तर कर्तव्यदक्ष पोलिसांनी संबोधिताची समजूत काढून सुद्धा सुद्धा ऐकत नसेल तर सौम्य लाठीमार केला असता परंतु, सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूच्या समर्थकांपुढे पोलिसांना सहानभूतीने पहावे लागले. कोणत्याही व्यक्तीवर शारीरिक इजा करणे चुकीचे आहे. त्याचे कोणीही समर्थन करणार नाही. बिचाऱ्या पोलिसांना सर्व परिस्थितीत सामंजसपणाने धक्काबुक्की खाऊन सुद्धा कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करावे लागलेले आहे. त्यांचे मनःपूर्वक आभार मानणे हे सुद्धा कर्तव्य आहे.असो… मुद्दा हा आहे की, जावळी तालुक्यात आलेवाडी व आखाडे आणि आनेवाडी या तीन आ . नावाने सुरू असलेल्या गावातील धागडधिंगा शांतता प्रिय व सहकारात चांगले काम करणाऱ्यांसाठी चिंताजनक ठरला होता. भविष्यातील संघर्ष आ पासून उभा आहे.. खेड्यापाड्यात मोकाट असलेला अनाधिकृत दारूधंदा व मटका आणि जुगार, चक्री वाढती गुंडगिरी या विरोधात समर्थक रस्त्यावर उतरले असते तर लोकांनी त्याचे स्वागत केले असते. पण, घडलेल्या घटना या सत्ता संपत्ती व दहशतवाद याच कॅटेगरी मध्ये मोडणारे आहेत.
मुळातच हे जावळीकरांना नवीन नाही. पाठीमागील इतिहास जर पाहिला तर फार वर्षपूर्वी राजकीय संघर्षातून जावळी पंचायत समितीच्या सभापतीच्या निवडीच्या वेळेला पळवा पळवी झाली होती. आता त्या पिढीतील हाताच्या बोटावर मोजणे इतकेच कार्यकर्ते जिवंत आहेत. त्यावेळेला सोशल मीडिया नसल्यामुळे त्या परिसराव्यतिरिक्त इतरांना त्याची फारशी माहिती सुद्धा नसेल. अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडियाच्या वाढत्या निरोपयोगी तणामुळे चांगल्या बातम्यांचे पीक सुद्धा नाहीसे होत आहे. याची चिंता आता सामान्य वाचक व्यक्त करत आहेत.
ज्यांना या घटनेबाबत उत्सुकता आहे अशी मंडळींनी जर तीस वर्षा मागील घटना आठवून ठेवावी. जावळी तालुक्यातील मेढा नगरीतील राजकीय संघर्ष दुधाच्या साई सारखा अनेकांनी गटबाजीमुळे जपला होता. शोले चित्रपटासारखे तुम्ही एक मारेंगे.. तो हम चार मारेंगे…. असे फक्त फिल्मी डायलॉगबाजी पूर्ती मर्यादा होती . त्यावेळी जावळी तालुका दूध संघाच्या निवडणुकीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जावळीत संघर्षाचे रोपट उभे केले. त्याला अनेकांनी खत पाणी घातले. आता नवीन पिढी आक्रमकरित्या एकमेकांच्या समोर आयमाय काढत आहे. पेरल तेच उगवेल. हा निसर्गाचा नियम आहे. त्याला कोणीही अपवाद नाही.
संपूर्ण देशात आता निकोप लोकशाही मार्गाने निवडणुका विजय होणे. सध्या दुरापास्त आहे. ग्रामीण भागामध्ये पूर्वी निवडणूक म्हटले की, फार तर जेवणावळ इथपर्यंत मर्यादित कार्यक्रम होत होता. आता टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम केला जात आहे. आपली प्रतिभा आणि प्रतिमा काय आहे? याचाही चांगल्या दर्जाच्या नेतेगण मंडळींना विसर पडत चाललेला आहे.
काही गावांमधील सार्वजनिक विकास कामांमध्ये मिळणारी टक्केवारी आणि नेत्यांचा वरदहस्त आणि वाढती बेरोजगारी यामुळे एक मोठं टोळकं सध्या जावळीकरांच्या हरिभक्त पारायण स्वभावावर घाव घालत आहे. त्यांना रोखण्याचे नैतिक बळ कुणाकडेही राहिले नाही.
एरवी खूप मोठ्या देशभक्तीचे गप्पा मारणारे सुद्धा अशा घटनेकडे तटस्थ भूमिकेतून पाहत आहेत. त्यामुळे जावळीकर म्हणून संयमी व एकमेकांचा आदर करून वागणाऱ्या लोकांसाठी आता जावळी चांगल्या विचारांच्या माणसांनाच कावली आहे . असे म्हणण्याची पाळी आली आहे.
एकेकाळी जावळीमध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, माजी सहकार मंत्री अभयसिंहराजे भोसले, आदरणीय माजी आमदार बाबासाहेब आखाडकर, भिकू दाजी भिलारे, लालसिंगराव शिंदे, जी. जी. कदम, माजी पंचायत समिती सभापती साहेबराव पवार यांच्यासारख्या सुसंस्कृत व संयमी आणि सामाजिक कार्याची जाण असणाऱ्या नेतृत्वाने येथील मातीचा सन्मान राखून कार्यकर्त्याला प्रतिष्ठा मिळवून दिली होती. आज ते सर्व इतिहासात जमा झालेले आहे. नव्या पिढीच्या हाती नवीन शस्त्र घेऊन त्याला चांगली धार लावली जात आहे. त्यामुळे खेड्यापाड्यात आता संघर्ष टोकाला जाऊ नये. यासाठी लोक प्रार्थना करत आहेत. पूर्वी गावात पाऊस नसेल तर महादेव देवळात कोंडून संपूर्ण गाव प्रार्थना करत होते. आता तर राजकारण पाहता गावागावात पालकांना धडकी भरत आहे. हे जावळीकरांना नवीन नसले तरी त्यामध्ये भविष्यात चिंताजनक घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शांत डोक्याने एकदा तरी याचा सर्वांनीच विचार करणे गरजेचे आहे. ज्याच्यामुळे या घटना घडलेल्या आहेत. त्यांचे नेते व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांचा निश्चितच यामध्ये सहभाग नसला तरी मूकसंमती असावी. याबद्दल शंका घेणे सुद्धा आता खेदजनक आहे. पूर्वी काही भागात पैलवान आले की, गावभर त्यांची दहशत होते. आता स्थानिक पातळीवर बाहेरच्या मित्र परिवारांच्या माध्यमातून गावावर दहशत पसरवण्यास सुरुवात केली आहे. याला जर विकास म्हणत असतील तर असल्या विकासापेक्षा जावळीतील पूर्वीची हायवे वरील सडक बरी होती. खरबुड्या रस्त्यावर चालताना त्रास होत नव्हता. नागरी सुविधा नसली तरी नेत्यांबद्दल आपुलकी वाटत होती. हे सर्व आता ओढ्या नदीला वाहून गेले आहे. अशी म्हणण्याची पाळी आली आहे. तूर्त एवढेच.. जावळीतील घडलेल्या अलीकडच्या वेदनादायक सत्ता संघर्षातून काहींची प्रतिष्ठा लयाला गेली आहे. ती परत मिळवणे अवघड बनत चाललेले आहे. पूर्वी सोन्यासारख्या माणसांना गावांमध्ये मानसन्मान होता. जिल्हा पातळीवरील नेते सुद्धा त्यांचा आदर करत होते. आता बेन्टेक्सचा जमाना असल्यामुळे सर्व चमकते ते सोने समजून खोट्या प्रतिष्ठा व बॅनरबाजी आणि जाहिरातबाजी मुळे जावळीतील तरुण भरकटला आहे. हीच मोठी चिंताजनक बाब आहे. त्यामुळेच हा छोटाशी मनातील भावना व्यक्त करत आहे. यामध्ये टीका टिपणी नसून एक जावळीकर म्हणून आपल्या सर्वांची जाहीर माफी मागून हे लिखाण करताना खूप वेदना होत आहे. तरीसुद्धा मन राहत नाही. म्हणून हा छोटासा संवाद साधत आहे. हे कुणासाठी व्यक्तिगत नसून माझ्या पिढीतील एका सामान्य व्यक्तीचा हा हुंदका आहे. या घटनेबाबत सुरुवातीला काही अंश मी सुद्धा एक जबाबदार व्यक्ती असू शकतो. हे नाकारत नाही. हे समजून घ्यावे. ही विनंती. चुकीबद्दल क्षमस्व………………. शक्य झाले तर प्रतिक्रिया द्यावी. त्यासाठी फारसा आग्रह करण्यासारखी स्थिती राहिलेली नाही.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 .. पत्रकार अजित जगताप, सायगाव तालुका जावळी जिल्हा सातारा.. 9922241299/9156140491
———————————————–
फोटो-जावळी तालुक्यातील सुसंस्कृत असलेल्या आखाडे गावातील हा राजकीय आखाडा.. व इमेज




