ताज्या बातम्या

ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा शुभारंभ; नशामुक्तीचा लढा देशाच्या भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : अमली पदार्थांविरोधातील लढा हा केवळ कायदा-सुव्यवस्थेचा विषय नसून देशाच्या भविष्यासाठीचा सामूहिक लढा आहे. त्यामुळे ‘ड्रग फ्री मुंबई’, ‘ड्रग फ्री महाराष्ट्र’ आणि ‘ड्रग फ्री भारत’ घडविण्यासाठी शासनासह समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
वरळी डोम येथे आज ‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा नशामुक्ती जनजागृती अभियानाच्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, वैद्यकीय तज्ज्ञ, समुपदेशक, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारत विज्ञान, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अंतराळ संशोधनात झपाट्याने प्रगती करत असताना युवा शक्तीला अमली पदार्थांच्या विळख्यात अडकविण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. त्यामुळे ड्रग्सविरोधातील लढा हा प्रत्येक नागरिकाने स्वतःचा समजून लढण्याची गरज आहे.
शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या टोळ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. पोलीस, आरोग्य, सामाजिक न्याय, शिक्षण विभाग, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या समन्वयातून अमली पदार्थमुक्त समाज घडविण्याचा निर्धार शासनाने केला आहे.
राज्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि महाविद्यालयांचे प्राचार्य यांना मार्गदर्शक सूचना पाठविण्यात येणार असून ‘ड्रग फ्री कॅम्पस’ आणि ‘ड्रग फ्री स्कूल’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. ड्रग्सविषयी माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल तसेच उपयुक्त माहिती देणाऱ्यांना पुरस्कारही दिले जातील, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.
व्यसनाधीन युवकांचे पुनर्वसन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यावर शासनाचा विशेष भर राहणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी युवकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता व्यसनांना ठाम नकार द्यावा, असे आवाहन केले. तसेच पुढील दोन ते चार वर्षांत **’ड्रग फ्री मुंबई’**चे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणेने अमली पदार्थमुक्त समाज घडविण्याची सामूहिक शपथ घेतली.
‘ड्रग फ्री मुंबई’ ही लोकचळवळ बनवूया – मंत्री मंगलप्रभात लोढा
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले की, ‘ड्रग फ्री मुंबई’ हे केवळ शासनाचे अभियान नसून समाजाच्या सक्रिय सहभागातून उभी राहणारी व्यापक जनचळवळ आहे. मुंबई पूर्णपणे अमली पदार्थमुक्त होईपर्यंत ही मोहीम सातत्याने राबविण्यात येईल. प्रत्येक नागरिकाने सामाजिक जबाबदारी म्हणून या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

Scroll to Top