मुंबई : नवी मुंबई सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने विरंगुळा केंद्रात माऊली भजन मंडळाचा ‘अभंगवाणी’ हा मंगलमय कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भजनाच्या या भक्तीमय कार्यक्रमामुळे सर्वांना पंढरपुरातील वारीच्या अनुभवाचा आनंद मिळाला. माऊली भजन मंडळाचे प्रमुख तुकाराम हाके महाराज यांचा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. भजनी मंडळात गायक शांताराम शिंगाडे, हार्मोनियम वादक: संभाजी माळी, तुकाराम हाके, तबला वादक : सुबराव यादव, राकेश सावंत, तुषार पिसाळ, टाळ आणि साथ संगीत: विक्रम गाडेकर, संगीता माळी, रवी किरण, मानधना, तावरे यांचा सहभाग होता. ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष लक्ष्मण गोळे यांनी भजनी मंडळाचे स्वागत केले तर सचिव जगदीश एकावडे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाचे खजिनदार महादेव पाटील, उपाध्यक्ष सीमा बोराडे, सहसचिव राजेंद्र कदम तसेच संघाचे आजी आणि माजी पदाधिकारी यांनी विशेष सहकार्य केले. या सुश्राव्य भजनाच्या कार्यक्रमास पुरुष व महिला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




