ताज्या बातम्या

म्हाडाच्या थकीत बिलांनी ठेकेदार आर्थिक कोंडीत; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे न्यायाची मागणी

मुंबई : मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ (म्हाडा) झोन-४ (एफ/उत्तर विभाग) येथे नोंदणीकृत ठेकेदार म्हणून कार्यरत असलेल्या M/s. आर्या इंटरप्राईजेसचे मालक शशिकांत शिरसेकर यांनी गेल्या १५ महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या बिलांच्या रकमा तातडीने अदा करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शिरसेकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार, त्यांनी बाजारातून ३ ते ४ टक्के व्याजदराने कर्ज काढून शासनाची कामे पूर्ण केली. मात्र, १५ महिन्यांपासून त्यांच्या एकाही बिलाची रक्कम अदा करण्यात आलेली नाही. शासनाकडून निधी उपलब्ध होत असतानाही काही अधिकाऱ्यांकडून “निधी नाही” किंवा “निधी आल्यावर पेमेंट करू” अशी कारणे देत देयके प्रलंबित ठेवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या आर्थिक अडचणींमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, आई-वडिलांच्या उपचारांचा खर्च आणि घेतलेल्या कर्जावरील व्याज भरणे अत्यंत कठीण झाले आहे. बदलापूर येथे वास्तव्यास असूनही दरमहा वाढणाऱ्या आर्थिक भारामुळे मानसिक तणाव निर्माण झाला आहे. “रात्री झोप लागत नाही, जेवणाची इच्छा होत नाही. कधी कधी आयुष्य संपवावे असेही वाटते,” अशी व्यथा त्यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर, झोन-४ मधील प्रलंबित बिलांची रक्कम पुढील १५ दिवसांत मंजूर करून देण्यात यावी आणि संबंधित प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून न्याय मिळावा, अशी मागणी शशिकांत शिरसेकर यांनी केली आहे.
दखल घेण्यासाठी सोशल मीडियावर टॅग करा :
#DevendraFadnavis #EknathShinde #MHADA #MumbaiBuildingRepairs #MaharashtraGovernment #CPRAMHADA #JusticeForContractors #PendingBills #ShashikantShirsekar #AryaEnterprises #Mumbai #Maharashtra #PublicWorks #ContractorsIssues #धगधगतीमुंबई

Scroll to Top