
कुडाळ(अजित जगताप) : जावळी तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या प्रति पंढरपूर करहर येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर म्हणजे वारकऱ्यांसाठी तीर्थक्षेत्र बनले आहे. अनेक गावच्या दिंडी या ठिकाणी येऊन माऊलीचा जयघोष करून आपला आत्मा तृप्त करत आहेत. त्याच धर्तीवर करहर -कुडाळ रस्त्यावरील शेते गावातील श्री विठ्ठल मूर्ती सध्या श्री शंकर महादेवाचे नंदी म्हणून उदयास आलेली आहे. या ठिकाणी वारकऱ्यांना नागरी सुविधा देऊन खऱ्या अर्थाने श्री. भालेघरे कुटुंबीयांनी वारकरी सेवा सुरू केली आहे. त्यांना अनेक जण धन्यवाद देत आहेत.
जावळी तालुक्यातील शेते जवळील अभिनव अँग्रो येथे उद्योजक श्री दत्ता पवार- भालेघरे कुटुंबीयांनी उभारलेल्या देखण्या व आकर्षक अशा ३७ फूट उंच श्री विठ्ठल मूर्ती म्हणजे या भागातील वारकऱ्यांसाठी दर्शन सोहळा आहे. या ठिकाणी माऊलीचे दर्शन घेऊन अनेक जण आपल्या दिवसाच्या कामाची सुरुवात करत आहेत. शेते येथील दोन एकर परिसरात प्रसन्न वातावरण आणि श्री . भालेघरे कुटुंबीयांनी निर्मळ मनाने केलेली वारकरी सेवा याचा अनोखा संगम आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांना अनुभवला आहे.
आषाढी एकादशी दिवशी पहाटे सहा वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत ग्रामीण भागातून आलेल्या जावळी तालुक्यासह वाई, सातारा, कोरेगाव महाबळेश्वर तालुक्यातील वारकऱ्यांसोबतच पुण्या मुंबईतून खास भेटीसाठी आलेल्या अनेकांनी या श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन आपली मनोकामना पूर्ण झाल्याचे सांगितले.शेते येथील शिवारात अभिनव ऍग्रो उद्योग समूहाच्या सहकार्याने वारकऱ्यांना धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच चहापान व प्रसाद आणि फराळाची व्यवस्था मोफत करण्यात आली होती. या सोहळ्याला भाविकांनी मनोभावे उदंड प्रतिसाद दिला.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले सातारा जिल्हा परिषद सदस्य वसंतराव ज्ञानदेव मानकुमरे, जावळीचे सभापती सौरभ शिंदे, भाजप तालुका अध्यक्ष संदीप परामणे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश भालेघरे , यशस्वी व्यावसायिक जयदीप शिंदे, पत्रकार अजित जगताप, शहाजीराजे गुजर आणि शरद रांजणे यांच्यासह मान्यवरांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन सर्वांच्या सुखाचे मनोकामना केली. यावेळी मंत्री महोदयांना श्री विठ्ठल रखुमाई ची मूर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला.
गेली सात वर्षापासून या ठिकाणी आषाढी एकादशीचा उत्सव सुरू झालेला आहे. या ठिकाणी कोलेवाडी, सोमर्डी, बामणोली, शेते या गावांमधून श्री माऊलीच्या दिंड्या व वृक्ष दिंडी निघत आहे. विठ्ठला… विठ्ठला… हरी ओम विठ्ठला… निघाले घेऊन दत्ताची पालखी… धार्मिक व आध्यात्मिक केंद्रबिंदू म्हणून आता शेटे विकसित झालेले आहे. व्यक्तिगत पातळीवर श्री भालेघरे यांनी केलेले कार्य हे समाजाला दिशादर्शक ठरले आहे. त्यांच्या दातृत्वामुळे अनेकांना साक्षात श्री विठ्ठलाचे दर्शन झाल्याचे सांगितले. आपुलकी येथील मूकबधिर शाळेतील मुलांच्या दिंडी हे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. सर्वांनी रांगेत उभे राहूनच श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन आपण खानदानी वारकरी असल्याचे दाखवून दिले. कुठेही राजकीय घुसखोरी झालेली नाही. आषाढी एकादशी निमित्त फक्त आध्यात्मिक विचारांचाच प्रभाव या ठिकाणी दिसून येत होता.भाविकांच्या मनोरंजनासाठी सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे व गौतम हराळ यांचा भजन कीर्तन व लोकसंगीताचा कार्यक्रमाचा ही अनेकांनी आस्वाद घेतला. बहारदार मैफल कार्यक्रम देखील संपन्न झाला. तसेच वीरेंद्र केंजळे यांचा साज, किशोर गोगावले आणि नलवडे महाराज यांच्या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमाने जमलेल्या सर्वच वारकऱ्यांना मंत्रमुग्ध केले .हिंदू धर्मात भगवान शंकराचे वाहन आणि सेवक असणाऱ्या नंदीचे महत्त्व अगाध आहे. नंदी हा निष्ठा, पवित्रता, एकाग्रता आणि आत्मसमर्पणाचे प्रतीक मानला जातो. शिवमंदिरात महादेवाचे दर्शन घेण्यापूर्वी नंदीचे दर्शन घेतात . असा अनुभव करहर प्रति पंढरपूर या ठिकाणी निघालेल्या वारकऱ्यांना आला आहे.
—————————————————-
फोटो -प्रतिपंढरपूर करहर रस्त्यावरील शेते गावातील विठ्ठल मूर्ती व मान्यवरांची उपस्थिती (छाया- अजित जगताप )




