सातारा : सातारा जिल्ह्यातील नामांकित अष्टपैलू क्रिकेटपटू तथा वाई येथील रहिवासी सुनील गाडेकर यांचे आज अल्प आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सातारा जिल्ह्याच्या क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली असून, क्रीडा क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
शैलीदार फलंदाजी, उत्कृष्ट लेग स्पिन गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षण या गुणांमुळे सुनील गाडेकर यांनी जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. शालेय जीवनापासूनच त्यांनी क्रिकेटची आवड जोपासली आणि आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर अनेक नामांकित संघांचे प्रतिनिधित्व केले.
ते सोशल क्लब, वाई, स्टेडियम क्लब, सातारा आणि सातारा जिमखाना या संघांकडून खेळले. तसेच सातारा जिल्हा क्रिकेट संघ आणि शिवाजी विद्यापीठ क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. आंतरविद्यापीठीय विझी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत त्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यांच्या गुणवत्तेची दखल घेत त्यांची महाराष्ट्राच्या २२ वर्षांखालील क्रिकेट संघात निवड झाली होती. तसेच रणजी क्रिकेट संघाच्या चाचणीसाठीही त्यांची निवड झाली होती.
मुंबईतून खेळण्याची संधीही त्यांना मिळाली होती. मात्र, अफाट गुणवत्ता आणि मेहनत असूनही नशिबाची साथ न मिळाल्याने त्यांना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळू शकली नाही. तरीही त्यांनी जिल्ह्यातील अनेक युवा क्रिकेटपटूंना प्रेरणा दिली.
त्यांच्या निधनाबद्दल सातारा जिल्ह्यातील आजी-माजी क्रिकेटपटू, क्रीडा संघटना आणि क्रिकेटप्रेमींनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या पार्थिवावर आज वाई येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सुनील गाडेकर यांच्या निधनाने सातारा जिल्ह्याने एक गुणी, संयमी आणि समर्पित क्रिकेटपटू गमावल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.




