
कुडाळ(अजित जगताप ) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी तालुक्यात सध्या सणासुदीला मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या गर्दीत काही दारुड्यांच्या नंगानाच सुरूच असतो. जावळीत दारूबंदी असूनही बेकायदेशीर दारू धंद्याबाबत कडक नियम काढले आहे. मग, त्यांना पाठीशी कोण घालते? याची माहिती असूनही कारवाई शून्य होत असल्याची टीका आता महिलावर्ग करू लागलेले आहेत.
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुका हा राज्यातील पहिला दारूबंदी (दारूमुक्त) असलेला तालुका म्हणून ऐतिहासिकदृष्ट्या महत्व आले होते. १६ ते १७ वर्षांपूर्वी दारूबंदी लागू करण्यात आली. संपूर्ण जावळी तालुका दारूमुक्त तालुका म्हणून राज्यात आदर्श पॅटर्न मानला गेला. त्यावेळेला राष्ट्रवादीची सत्ता होती. आता सत्तांतर झाले असले तरी दारू विकणारे तेच.. पिणारे हे तेच. काही मयत झाले पण त्यांच्या जागी दुसरे आले. फक्त जावळीतील प्रशासन व पोलीस आणि पक्ष बदलला का? असे धाडसाने नमूद करावे वाटत आहे. आदरणीय व्यसनमुक्ती संघटनेचे राज्य अध्यक्ष विलासबाबा जवळ यांनी मोठ्या धाडसाने मेढा या तालुक्याच्या ठिकाणी दारू पकडून दिली. पण आता मीेे चौकात थेट गावटगे स्वतः दारू विकू लागल्यामुळे चळवळ सुद्धा हतबल झालेली आहे.
जावळीतील स्वाभिमानी महिला व ग्रामस्थांनी एकत्र येऊन दारू मुक्तीचा धाडसी व ऐतिहासिक निर्णय घेतला.सध्या या दारूबंदी असलेल्या कुडाळ , करहर, केळघर, तापोळा, पानस फाटा, सोनगाव साखर कारखाना, सरताळे, शेते ,आनेवाडी, महिगाव, सायगाव, रायगाव व इतर भागात चोरून आणि अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याच्या तक्रारी आहेत.लगतच्या वाई , महाबळेश्वर, सातारा तालुक्यांमधील अधिकृत दारू दुकानातून ही दारू जावळीत खुलेआम सप्लाय होते.
जावळीतील दारूबंदीचा मूळ हेतू पूर्ण झालेला नाही. त्यामुळे पुन्हा दारूच्या दुकानासाठी निविदा काढावी. अशी आता मागणी होत आहे. कुडाळ आणि परिसरातील काही ग्रामस्थ व राजकीय पदाधिकाऱ्यांनी दारूबंदी उठवून अधिकृत दुकाने सुरू करावीत, असा ठराव सुद्धा केला आहे.प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग अवैध दारूविक्रीवर वेळोवेळी धाडी टाकून कायदेशीर कारवाई करत आहेत. हा साप शिडीचा खेळ गेली सोळा वर्षे सुरू आहे. तरी अनेक ठिकाणी सरास चोरट्या पद्धतीने दारू विक्री केली जाते.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या सोळा वर्षात सुमारे चाराशे वेळा दारू पकडली पण, संबंधित गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी याच्यावर दारू विक्रीची गोष्ट लपवल्याबद्दल कारवाई एक सुद्धा झालेली नाही. राजकीय पाठ्यबळामुळे दारू विक्रेते मोकाट आहेत. हे सर्व गुणसंपन्न लोकप्रतिनिधी यांना ही चांगलेच ठाऊक आहे. मताची नशा असल्यामुळे ते सुद्धा काही बोलत नाहीत.
जावळी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध दारूविक्री होत असल्याच्या तक्रारींनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहीम राबवून तालुक्यातील २१ अवैध दारू अड्ड्यांवर धाडी टाकल्या होत्या. या धाडसत्रात विभागाने वेगवेगळ्या कारवायांमध्ये २४ ते ३७ जणांवर गुन्हे दाखल करून अनेकांना अटक केली होती. त्यांनाही जामीन देणारा समाज जावळीत विखुरलेला आहे.
महाराष्ट्रात अवैध दारू निर्मिती, वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा, १९४९ (Maharashtra Prohibition Act, 1949) आहे. कलम ६५ नुसार बेकायदेशीरपणे दारू तयार करणे, जवळ बाळगणे, वाहतूक करणे किंवा विक्री करणे या प्रकरणी गुन्हा दाखल होतो. यामध्ये ३ ते ५ वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि मोठ्या दंडाची तरतूद आहे. सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन धिंगाणा घालणे किंवा बेकाबू वर्तन करणे यासाठी अटक केली जाते. महाराष्ट्र शासनाच्या नवीन निर्देशानुसार, गावात हातभट्टी किंवा अवैध दारू आढळून आल्यास माहिती लपवल्याप्रकरणी आता थेट सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील आणि तलाठी यांच्यावरही शिस्तभंगाची किंवा निलंबनाची कारवाई करण्याचा नियम आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या जून २०२६ मधील नव्या आदेशानंतर जावळी तालुक्यात किंवा सातारा जिल्ह्यात अद्याप कोणत्याही सरपंच, ग्रामसेवक किंवा तलाठ्यावर थेट निलंबनाची कारवाई झालेली नाही. हे सुद्धा अभिमानाने नमूद करण्यात आले आहे. वास्तविक पाहता जावळी तालुक्यात बेकायदेशीर दारू धंद्यासाठी मिळणारी जागा, आसपासच्या पान टपरी व दुकानात ठेवण्यात आलेले युज अँड थ्रोची प्लास्टिक ग्लासे, दारुड्या दारुड्यांसाठी लागणारे चकणा एवढंच नव्हे तर बंदी असलेला गुटखा सुद्धा मिळतो. ते सुद्धा तेवढेच दोषी आहेत. फक्त पोलीस व राज्य उत्पादन शुल्क त्याला जबाबदार नसून लोकप्रतिनिधी सुद्धा जबाबदार आहे. हे ज्यावेळी प्रामाणिकपणाने मतदान करणाऱ्या मतदारांना कळेल तेव्हाच जावळीतील दारूबंदी शंभर टक्के यशस्वी ठरेल. असा विश्वास जावळी तालुक्यातील मूळनिवासी असलेले व सध्या सणासुदीसाठी जावळीत आलेल्या अनेकांनी व्यक्त केला आहे.
जावळी तालुक्यामध्ये सोळा वर्षांमध्ये पुलाखालून बरीच दारू वाहून गेली. आता मटका, गुटखा, चक्रीने प्रवेश केला आहे. जावळीतील व्यसनी मुलांचे पालक त्रस्त आहेत. पण, असे बालक उत्सवामध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. काहींना दोन नंबर वाल्याकडून दिवाळीची पाकिटं पोहोचत असल्याने अनेकांना हे अवघड जागेचं दुखणं सहन करावे लागत आहे. अशी स्थिती आहे.
………………………………………… फोटो-




