मुंबई : सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉइज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., मुंबईच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली सहविचार सभा पार पडली. यावेळी विविध शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी समता पॅनलच्या माध्यमातून एकत्र येण्याचा निर्धार व्यक्त केला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जे. आर. पाटील यांनी विद्यमान कारभारावर टीका करत चंद्रकांत पाटील यांना समता पॅनलमधून वगळल्याचे जाहीर केले. सभासदांच्या पैशाचा विनियोग त्यांच्या हितासाठी व्हावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
आनंदराव अडसूळ यांनी समता पॅनलला जाहीर पाठिंबा देत सभासद व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सर्व संघटनांनी एकत्र काम करण्याचे आवाहन केले.
मतदार यादीतील पत्त्यांबाबत आणि निवडणूक कार्यक्रमाच्या प्रसिद्धीबाबतही सभेत आक्षेप नोंदविण्यात आले. सभासदांनी आपले पत्ते दुरुस्त करून घेण्यासाठी अध्यक्षांना पत्र पाठवावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी सुभाष मोरे, शिवनाथ दराडे, शिवाजी शेंडगे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.




