मुंबई : मुंबईतील पात्र फेरीवाल्यांच्या वारसांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी धोरण निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विधी समिती अध्यक्षा दीक्षा कारकर यांनी संबंधित प्रशासनाला याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले.
विधी समितीच्या बैठकीत ठाकरे सेनेचे सदस्य सुहास वाडकर यांनी फेरीवाल्यांचा प्रश्न उपस्थित केला. २०१४ मध्ये मुंबईत झालेल्या सर्वेक्षणानुसार शहरात सुमारे ९९ हजार फेरीवाले असल्याचे नोंदविण्यात आले होते. त्यापैकी पात्र ठरलेल्या ४८ हजार फेरीवाल्यांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले आहे.
मात्र, या पात्र फेरीवाल्यांपैकी ३,१७६ जणांचे निधन झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना व वारसांना संबंधित ओळखपत्र हस्तांतरित करण्यासाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
याप्रकरणी आवश्यक धोरण तयार करून त्याबाबतचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, धोरण निश्चित झाल्यानंतर मृत फेरीवाल्यांच्या पात्र वारसांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे दीक्षा कारकर यांनी सांगितले.




