
करहर(अजित जगताप) : नैसर्गिक वरदान लाभलेल्या सह्याद्रीच्या खोऱ्यातील कावडी ता. जावळी धरणामुळे विस्थापित झाले तरी विकासाच्या वाटेवर भक्कम पणाने उभी राहिली आहे. विकासकामाने मूल्यमापन करणारी समिती सुद्धा भारावून गेली आहे. ग्रामीण भागातील विकास कामे व स्वागताने खऱ्या अर्थाने जावळी तालुक्यातील कावडीने बाजी मारली आहे. असे सध्यातरी चित्र दिसत आहे.
मुख्यमंत्री समृद्ध ग्राम पंचायत राज अभियानामध्ये जावळी तालुक्यातील एकमेव गाव असलेल्या कावडी ग्रामपंचायतीने जिल्हा स्तरावरची द्वितीय क्रमांक पटकावला आहे.दर्जेदार काम करून दाखवले आहे. असे पाहणी केल्यानंतर अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व विभागीय मूल्यमापन समितीचे अध्यक्ष विजय मुळीक यांनी आपला अभिप्राय नोंदवला आहे. तसेच इतर सदस्यांनीही कौतुक केले आहे.
विभागस्तरीय मूल्यमापन समितीने बुधवारी निसर्गरम्य कावडी गावांमध्ये दुपारी फेरफटका मारून अनेक विकास कामाची पाहणी केली. प्रारंभिक पारंपरिक पद्धतीने समितीचे कावडी गावच्या हद्दीत आगमन होताच ढोल ताशाच्या गजरात समितीचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले.
यावेळी समिती सदस्य रामप्रसाद लाहोटी (अप्पर आयुक्त, विकास, विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक), राजन पाटील (प्रकल्प संचालक, पुणे), दादासाहेब गुंजाळ (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहिल्यानगर), पी. एस. म्हस्के (कृषी विभागीय अधिकारी, जळगाव), रवींद्र महाजन (कार्यकारी अभियंता, नाशिक), राहुल देसाई (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा), जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे, जावळीचे गटविकास अधिकारी निलेश पाटील, कावडीचे सरपंच यशवंत मानकुमरे, उपसरपंच शशिकांत मानकुमरे ,नितीन मानकुमरे, प्रमोद मानकुमरे, ग्रामविकास अधिकारी मंगेश शिंदे तसेच माता भगिनी व कावडी ग्रामस्थ, क्रीडा मंडळ आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
समितीने कावडी ग्रामपंचायत कार्यालय, सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक स्वच्छता व्यवस्था, वृक्षारोपण मोहिम, उपहारगृह ,रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता उपक्रम, जलसंवर्धन व धरणाचे निसर्ग रम्य परिसरातील वृक्षारोपण आणि कावडी ग्रामपंचायतीने राबविलेल्या उपक्रमांची पाहणी करून त्याची नोंद घेतली.
भाजप नेत व राज्याचे सार्वजनिक
बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व जिल्हा परिषद सदस्य वसंतराव ज्ञानदेव मानकुमरे, बापूसाहेब मानकुमरे व सर्व ग्रामस्थांचे या पाठीमागे परिश्रम आहेत. शासकीय पातळीवरही सकारात्मक रित्या सहकार्य लाभल्यामुळे कावडी गाव ग्राम समृद्ध झाले आहे. असे श्री मानकुमरे यांनी मनोगत व्यक्त केले.
विभागीय मूल्यमापन समितीच्या सर्व सदस्यांनी खऱ्या अर्थाने कावडी गावातील ग्रामस्थांच्या सहकार्याने उभी केलेल्या विकास कामाची प्रगती व नैसर्गिक वरदान लाभलेल्या निसर्गाचा ही मनमुराद आनंद घेतला. गुलाबी फेट्यामध्ये व गुलाबी वातावरणात खऱ्या अर्थाने कावडी एक पर्यटन स्थळ बनले आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कावडी गावच्या माता भगिनींच्या उत्साह खऱ्या अर्थाने नारी शक्तीचा विजय ठरला आहे. त्याचे विभागीय मूल्यमापन समितीने मनापासून कौतुक केले आहे.
————————————————-
फोटो — जावळी तालुक्यातील समृद्ध कावडी गावचा गौरव करताना सार्वजनिक बांधकाम मंत्री (छाया– निनाद जगताप करहर)




