ताज्या बातम्या

लोकसहभागातून साकारलेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमामुळे श्रद्धेला आरोग्याची साथ, सेवेला संत परंपरेची  जोड

मुंबई : घेईन मी जन्म याजसाठीं देवा, तुझी चरणसेवा साधावया संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या या अभंगातील चरणसेवा ही केवळ भक्तीची अभिव्यक्ती नाही; ती सेवा, समर्पण आणि मानवतेचे तत्त्वज्ञान आहे. प्रत्येक गरजूची सेवा हीच ईश्वरसेवा, ही संतपरंपरेची शिकवण आजही तितकीच प्रेरणादायी आहे. याच संतविचारातून प्रेरणा घेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत चरणसेवा हा अभिनव लोकाभिमुख आरोग्य उपक्रम साकार झाला.

आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक परंपरेचे प्रतीक आहे. लाखो वारकरी विठ्ठलनामाचा गजर करीत शेकडो किलोमीटर पायी पंढरपूरकडे प्रस्थान करतात. या प्रदीर्घ प्रवासात श्रद्धेची ऊर्जा असली, तरी शारीरिक ताण, स्नायूदुखी, फोड, थकवा तसेच पावसाळ्यातील संसर्गजन्य आजारांचे संकटही असते. या वास्तवाची संवेदनशील दखल घेत श्रद्धेला आरोग्याचा आधार देण्याची संकल्पना चरणसेवा उपक्रमातून प्रत्यक्षात आली.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे पायांची मालिश असा शब्दप्रयोग न करता चरणसेवा हा संतपरंपरेशी सुसंगत शब्द स्वीकारण्यात आला. कारण येथे सेवा ही केवळ शरीराची नाही, तर श्रद्धेचा सन्मान, सेवाभावाची अभिव्यक्ती आणि माणुसकीचा उत्सव आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने शासन यंत्रणा, वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा प्रशासन, आरोग्य संस्था, स्वयंसेवी संस्था आणि हजारो स्वयंसेवकांना एका ध्येयासाठी एकत्र आणले. या लोकसहभागातून धार्मिक परंपरा, आधुनिक आरोग्य सेवा आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा प्रभावी संगम घडला. दानशूर व्यक्ती, उद्योगसमूह आणि सामाजिक संस्थांनी औषधे, आयुर्वेदिक तेल, वैद्यकीय साहित्य, पिण्याचे पाणी, अल्पोपहार तसेच इतर आवश्यक साहित्य वस्तूरूपाने उपलब्ध करून दिले. त्यामुळे लोकसहभागातून हा उपक्रम अधिक व्यापक आणि परिणामकारक ठरला.

२०२५ मध्ये सातारा, पुणे, सोलापूर, नाशिक, जालना, बीड, धाराशिव या सात जिल्ह्यांतील ३३७ सेवा केंद्रांवर हा उपक्रम राबविण्यात आला. २१९ आरोग्य संस्थांच्या सहभागातून ९ हजार ४७५ डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवकांनी सुमारे १ लाख ७५ हजार वारकऱ्यांना प्रत्यक्ष आरोग्यसेवा दिली, तर १० लाखांहून अधिक नागरिकांपर्यंत प्रतिबंधात्मक आरोग्याचा संदेश पोहोचविला.

या यशानंतर २०२६ मध्ये चरणसेवाचा विस्तार सात जिल्ह्यांवरून बारा जिल्ह्यांपर्यंत करण्यात आला. सातारा, पुणे, सोलापूर, नाशिक यांच्यासह बुलढाणा, अकोला, जालना, बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, वाशिम आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांचाही त्यात समावेश करण्यात आला. सुमारे १९० मुक्कामस्थळे आणि जवळपास ४०० सेवा केंद्रांवर औषधी आयुर्वेदिक तेलाद्वारे चरणसेवा, फिजिओथेरपी, आरोग्य तपासणी, आवश्यक औषधांचे वितरण, प्रथमोपचार, रुग्णवाहिका सुविधा तसेच गरजेनुसार पुढील उपचारांसाठी संदर्भ (रेफरल) सेवा उपलब्ध करून देण्यात आली. या सेवाकार्यात १२ हजारांहून अधिक डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवक सहभागी झाले.

उपक्रमात प्रतिबंधात्मक आरोग्यालाही तितकेच महत्व देण्यात आले. आठ आरोग्य जनजागृती रथांच्या माध्यमातून स्वच्छता, सुरक्षित पिण्याचे पाणी, संसर्गजन्य व पावसाळी आजारांपासून बचाव, रक्तदान, अवयवदान, निरोगी जीवनशैली तसेच विविध शासकीय आरोग्य योजनांबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली. त्यामुळे वारी ही केवळ आध्यात्मिक यात्रा न राहता सार्वजनिक आरोग्य जनजागृतीचे प्रभावी माध्यम ठरली.

चरणसेवा हा केवळ आरोग्य उपक्रम नाही; तो संतपरंपरेतील सेवाभाव, लोकसहभाग आणि आधुनिक सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा सजीव संगम आहे. श्रद्धेचा सन्मान राखत वारकऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारणारा हा उपक्रम समाजाभिमुख व्यवस्थापनाचे प्रभावी उदाहरण ठरला आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत लोकसहभाग किती प्रभावी ठरू शकतो, याचीही या उपक्रमाने प्रचिती दिली आहे.

आज चरणसेवा हा केवळ एक उपक्रम किंवा सेवा राहिलेली नाही; ती महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील सेवाभावाला आधुनिक आरोग्य व्यवस्थेची जोड देणारी लोकचळवळ बनली आहे. वारकऱ्यांच्या पावलांना आरोग्याचा आधार, सेवेला नवा अर्थ आणि समाजाला लोकसहभागाची नवी दिशा देणारा हा उपक्रम भविष्यात देशातील इतर मोठ्या धार्मिक यात्रांसाठीही प्रेरणादायी ठरू शकतो. संत तुकाराम महाराजांच्या तुझी चरणसेवा साधावया या विचाराचे आजच्या काळातील हे लोकाभिमुख आणि कृतीशील रूप आहे. असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले

Scroll to Top