ताज्या बातम्या

लावणी कलावंत महासंघाचा १२ वा वर्धापन दिन उत्साहात; लोककला क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव, गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान

मुंबई : लावणी कलावंत महासंघाच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त लोककला आणि विशेषतः लावणी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रातील महिला व पुरुष कलावंतांचा भव्य सत्कार सोहळा छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, दादर येथे उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास चित्रपट महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मेघराज भोसले, पद्मश्री रघुवीर खेडकर, उद्योजक शिवाजी तोरणे, चारुशीला गोलम, पार्श्वगायिका शकुंतला जाधव, शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष राजाराम बुवा शेलार, सचिव एच. बी. जंगम, पत्रकार भीमराव धुळप, निर्माते इंजि. मोहन पवार यांच्यासह कला, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी लोककला व लावणी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलावंतांचा “लावणी गौरव पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात आला. तसेच चित्रपट अभिनेते चंद्रकांत बारशिंगे यांना जीवनगौरव पुरस्कार पद्मश्री रघुवीर खेडकर व मेघराज भोसले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याशिवाय विविध क्षेत्रातील पुरस्कारांचे वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लावणी कलावंत महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या गुणवंत मुलांचा गुणगौरव सोहळाही मोठ्या उत्साहात पार पडला. शैक्षणिक, सांस्कृतिक व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या उपक्रमामुळे कला आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रांचा समन्वय साधण्याचा महासंघाचा सकारात्मक दृष्टिकोन अधोरेखित झाला.
यापूर्वी ३ जून रोजी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष लिंबोरे पाटील, विश्वस्त जयेश चाळके, अध्यक्षा कविता घडशी, सरचिटणीस विशाल सदाफुले, खजिनदार योगिता मोर्जे आणि समन्वयक विजय कर्जावकर यांनी यंदाच्या पुरस्कारांची घोषणा केली होती.
यंदाच्या पुरस्कारांमध्ये नामवंत संगीतकार मधुकर रेडकर, शाहीर आनंद सावंत, लावण्यवती कविता घडशी, लोककलावंत चंद्रकांत बारशिंगे, गायिका श्रद्धा साळवी, निर्माते शंकर पिसाळ, गायक राजेश धाऊस्कर, ध्वनी संयोजक संदेश गायकवाड, तालवादक दीपक गायकवाड तसेच पुरुष लावणी कलावंत चंद्रकांत तांबे यांचा गौरव करण्यात आला. राजा-राणी पुरस्कार श्री व सौ. मयुरी–सुनील खंडागळे यांना प्रदान करण्यात आला.
लावणी कलावंत महासंघाचा वर्धापन दिन हा केवळ पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम नसून, कलावंतांना प्रेरणा, प्रोत्साहन आणि नवचैतन्य देणारा सांस्कृतिक सोहळा असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. गेल्या अकरा वर्षांपासून महासंघाने सातत्याने लोककला व लावणी क्षेत्रातील कलाकारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे दरवर्षी या महोत्सवाची कलाकारांमध्ये मोठी उत्सुकता असते.
कार्यक्रमास लावणी कलावंत महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष लिंबोरे पाटील, अध्यक्षा कविता घडशी, सर्व पदाधिकारी, कलावंत आणि रसिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Scroll to Top