
म

ुंबई : स्वामीराज प्रकाशन आणि पल्लवी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा मराठी भाषा चळवळीतील प्रतिष्ठेचा “अंबुद” पुरस्कार यंदा जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी ‘आम्ही गिरगावकर’, मराठी एकीकरण समिती, संजय यादवराव आणि हरी पाटणकर यांना मराठी भाषा, संस्कृती आणि मराठी समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
मराठी भाषा आणि मराठी भाषिकांच्या हितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार दरवर्षी प्रदान केला जातो. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि ग्रंथभेट असे आहे.
यंदाच्या पुरस्कारांमध्ये गिरगावातील मराठी समाजाचा प्रभावी आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘आम्ही गिरगावकर’ संस्थेची निवड करण्यात आली आहे. तसेच शिवराज्य चळवळीच्या माध्यमातून मराठी भाषा, मराठी शाळा, व्यावसायिक आणि नवउद्योजक यांना एकत्र आणण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणारे संजय यादवराव, मराठी माणसांच्या हक्कांसाठी सातत्याने लढणारी मराठी एकीकरण समिती, तसेच मराठी रंगभूमीकडे प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ नाट्य व्यवस्थापक हरी पाटणकर यांचा गौरव केला जाणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळा रविवार, २६ जुलै २०२६ रोजी रात्री ८ वाजता दादर येथील छत्रपती शिवाजी मंदिर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त ‘आषाढ वारी’ हा अभंगवाणीचा विशेष कार्यक्रम सादर होणार असून त्यात आप्पा वढावकर, प्रशांत काळुंद्रीकर, मानस भागवत, विद्या करलगीकर आणि आसावरी बोधनकर सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे निरूपण दीप्ती भागवत करणार आहेत. या कार्यक्रमाची निर्मिती भाऊ कोरगावकर आणि निलेश भोसले यांनी केली असून सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य आहे.
या सोहळ्यास मराठी भाषा, साहित्य, नाट्य आणि संस्कृतीप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




