कराड(प्रताप भणगे) : माजी सहकारमंत्री कै. विलासराव पाटील उंडाळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या समाजाभिमुख कार्याला अभिवादन करत ओंड येथील पंडित गोविंद पंत हायस्कूलमध्ये गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या आणि पुस्तकांचे वाटप करण्यात आले. शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासणे आणि कै. उंडाळकर यांच्या लोकहितवादी विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
कै. विलासराव पाटील उंडाळकर यांनी सहकार, शिक्षण, ग्रामीण विकास आणि सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी केलेले कार्य आजही प्रेरणादायी मानले जाते. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित या उपक्रमात आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी कै. उंडाळकर यांच्या लोकाभिमुख कार्याचा गौरव करत, त्यांच्या विचारांचा वारसा केवळ स्मरणातून नव्हे तर अशा विधायक उपक्रमांद्वारे जपण्याची गरज व्यक्त केली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष शरदकुमार शिंदे, सचिव प्रकाश शिंदे, संचालक शिवदास रेळेकर, सुरेश थोरात, मुख्याध्यापक आर. डी. जाधव तसेच तारूखचे माजी उपसरपंच विक्रम पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आर. डी. जाधव यांनी केले, तर आभार एस. एम. थोरात यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोट :
“कै. विलासराव पाटील उंडाळकर यांचे कराड दक्षिणच्या विकासासाठीचे योगदान अविस्मरणीय आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित असे सामाजिक उपक्रम त्यांच्या कार्याला खरी आदरांजली ठरतात. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, शिक्षणाविषयीची प्रेरणा आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत आवश्यकता आहे.”
– विजयसिंह थोरात
संचालक, ओंड शिक्षण मंडळ, ओंड
फोटो कॅप्शन :
कै. विलासराव पाटील उंडाळकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना विजयसिंह थोरात, शरदकुमार शिंदे, प्रकाश शिंदे, शिवदास रेळेकर व अन्य मान्यवर.




