मलकापूर (प्रताप भणगे) : मलकापूर येथील हौसाई विद्यालयात सामाजिक बांधिलकी जपत गरीब व होतकरू विद्यार्थिनींसाठी मदत उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब कराडचे माजी अध्यक्ष तथा अर्बन बँक कराडचे संचालक राजेश विश्वनाथ खराटे आणि अर्बन बँक कराडचे संचालक राजेंद्र नारायण कुंडले यांच्या हस्ते विद्यालयातील एका गरजू विद्यार्थिनीला हरक्युलिस कंपनीची सायकल भेट देण्यात आली.
तसेच त्यांचे मित्र विनोद भय यांच्या कन्या सिमृती विनोद भय चेतावणी हिच्या सोळाव्या वाढदिवसानिमित्त विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना पॅरागॉन कंपनीच्या ४० जोड सँडल्सचे सप्रेम वाटप करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना राजेश खराटे म्हणाले, “समाजात अनेक गरीब व होतकरू विद्यार्थी-विद्यार्थिनी आहेत. आर्थिक अडचणींमुळे अनेकांना शिक्षणापासून दूर जावे लागते. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी योगदान देणे ही काळाची गरज आहे.”
राजेंद्र कुंडले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “आमच्या शालेय जीवनात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती. त्यामुळे शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्याच अनुभवातून प्रेरणा घेत आम्ही गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण कोणत्याही कारणाने खंडित होऊ नये, यासाठी सातत्याने कार्य करत आहोत.”
यावेळी हौसाई विद्यालयातील शिक्षकांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगत, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालयात विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम नियमितपणे राबविले जात असल्याचेही मान्यवरांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक कल्याण कुलकर्णी यांनी केले. यावेळी बी.एड. महाविद्यालयाचे प्राचार्य धनवडे सर, प्राचार्य सतीशकुमार सावळकर, प्रकाश बाबर, अंजली पाटील, पद्मावती मुळीक, बालाजी मुंडे, किरण कुंभार, विकास शिंगाडे, मोहसीन नायकवडी, सचिन चव्हाण, रघुनाथ पाटील, सुधाकर कांबळे, तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




