ताज्या बातम्या
तमाशा च्या फडातुन सांस्कृतिक प्रवास सुरु केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अन् लावणीसम्राज्ञी मधु कांबीकर यांचं आकस्मिक निधन; मराठी सिनेसृष्टीवर शोककळालोककलेच्या नभांगणातील ‘मधुरंग’; लावणीसम्राज्ञी मधु कांबीकर…! पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राजशिष्टाचार बाजूला ठेवून मधुबाईंसोबत धरलेला फुगडीचा फेर!क्राफ्ट पेपरच्या दरात तीन महिन्यांत २५ टक्क्यांपर्यंत वाढ; कोरुगेटेड बॉक्स उद्योग संकटात बॉक्स उत्पादकांची दरवाढ लागू करण्याची आणि पेपर मिल्सकडे दर स्थिर ठेवण्याची मागणीपर्यावरण संवर्धनासाठी ‘वसुंधरा पायी दिंडी’; १४ ते १७ ऑक्टोबरदरम्यान कराड तालुक्यातून मार्गक्रमणपुणे जिल्ह्याचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा’ करावे : डॉ. अविनाश सकुंडे

एअर इंडिया इमारतीतील कंत्राटी कामगारांचा प्रश्न अद्याप कायम; मंत्र्यांच्या आदेशानंतरही अमलबजावणी नाही, कारवाईची मागणी

मुंबई(भीमराव धुळप) : नरिमन पॉईंट येथील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत राज्य सरकारने १,६०१ कोटी रुपयांना विकत घेतल्यानंतर तेथे कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना सहकार सेनेचे मुंबई अध्यक्ष जगदीश लाड यांनी कामगारांच्या समस्या जाणून घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची मंत्रालयात भेट घेऊन कंत्राटी कामगारांना पूर्ववत कामावर ठेवण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती.

या बैठकीत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामगारांना पूर्ववत कामावर ठेवण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, या आदेशानंतरही प्रत्यक्षात कोणतीही अमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.

कामगारांच्या म्हणण्यानुसार, निवेदन देऊन जवळपास एक महिना उलटला असला तरी कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने त्यांच्याशी चर्चा केलेली नाही. एअर इंडिया इमारतीतील कंत्राटी कामगारांचा करार ३० जून रोजी संपुष्टात आला असून, त्यानंतर नवीन कराराचे नूतनीकरण अद्याप झालेले नाही. तरीही १ जुलैपासून सर्व कामगार नियमितपणे कामावर हजर राहत आहेत. मात्र, त्यांना अधिकृत मान्यता, वेतन अथवा पुढील सेवेबाबत कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही.

यामुळे “काम करणाऱ्या कामगारांचा पगार कोण देणार?”, “आम्हाला कायम ठेवणार की नाही?”, असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे कामगार व त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट ओढवले आहे. लवकरच या प्रश्नावर तोडगा न निघाल्यास अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट सूचना दिल्यानंतरही त्या आदेशाची अंमलबजावणी का झाली नाही, असा सवाल उपस्थित करत, जर संबंधित अधिकाऱ्यांकडून हलगर्जीपणा झाला असेल तर त्यांच्यावर सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणी कामगारांनी केली आहे.

दरम्यान, सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कंत्राटी कामगारांच्या रोजगाराबाबत तातडीने निर्णय घ्यावा आणि त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शिवसेना सहकार सेनेचे मुंबई अध्यक्ष जगदीश लाड यांनी केली आहे.

Scroll to Top