ताज्या बातम्या

युवा कृषी उद्योजक संतोष जाधव आणि आनंद नलावडे यांचा ‘यशस्वी उद्योजक पुरस्काराने’ सन्मान

सातारा(नितीन गायकवाड) : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रीकल्चरचे अध्यक्ष श्री. रवींद्र माणगावे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘गाव तिथे उद्योजक’ उद्योग संवाद परिषदेत सातारा जिल्ह्यातील दोन युवा कृषी उद्योजकांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या परिषदेत महाबळेश्वर तालुक्यातील वाळणे येथील ‘आनंदसागर कृषी पर्यटन’चे युवा उद्योजक श्री. आनंद नलावडे आणि देवळी येथील ‘माय बेरी जाम’चे युवा उद्योजक श्री. संतोष जाधव यांना त्यांच्या यशस्वी उद्योजकीय वाटचालीबद्दल ‘यशस्वी उद्योजक पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे आणि महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा पाटील यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ग्रामीण भागात उपलब्ध असलेल्या कृषी संसाधनांचा उपयोग करून शेतीला उद्योगाची जोड देत रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या या युवा उद्योजकांच्या कार्याचे यावेळी कौतुक करण्यात आले. ग्रामीण भागातील तरुणांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक उद्योग व व्यवसायाकडे वळावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमाचे आभार महाराष्ट्र चेंबरचे कार्यकारी सदस्य श्री. शैलेश जाधव यांनी मानले.

Scroll to Top