ताज्या बातम्या

‘फिट इंडिया’च्या ‘संडेज ऑन सायकल’ उपक्रमाचा रविवारी शंभरावा टप्पा; देशभरातील १०० ठिकाणी भव्य सायकल रॅली

मुंबई : केंद्र सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या ‘फिट इंडिया मूव्हमेंट’तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘संडेज ऑन सायकल’ या उपक्रमाचा शंभरावा ऐतिहासिक टप्पा रविवार, २९ नोव्हेंबर रोजी देशभरात उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने देशातील १०० प्रमुख ठिकाणी एकाच वेळी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, मुंबईतील वरळी सी फेस कोस्टल रोडवरील सायकल ट्रॅकवरही हा उपक्रम पार पडणार आहे.
या ऐतिहासिक सोहळ्याचे नेतृत्व केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा तसेच कामगार व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया हे पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथे करणार आहेत. पद्मश्री पुरस्कारप्राप्त जिम्नॅस्ट दीपा करमाकर, भारतीय व्यावसायिक कुस्तीपटू शिवानी पवार यांच्यासह विविध क्रीडा क्षेत्रांतील मान्यवर आणि हजारो फिटनेसप्रेमी या उपक्रमात सहभागी होणार आहेत. देशभरातील दीड लाखांहून अधिक माय भारत स्वयंसेवकही या मोहिमेत सहभागी होणार असून, यावेळी ‘नशामुक्त भारत’ची शपथ घेतली जाणार आहे.
या वर्षीच्या शंभराव्या उपक्रमाची संकल्पना ‘पेडलिंग टुवर्ड्स इंडियाज ऑलिम्पिक ड्रीम’ अशी असून, उत्कृष्टता, आदर आणि मैत्री या ऑलिम्पिक मूल्यांचा प्रसार करणे हा या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे. देशात क्रीडा संस्कृती रुजविणे, नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैलीची सवय लावणे आणि भविष्यात भारताने ऑलिम्पिक स्पर्धांचे यजमानपद भूषविण्याच्या महत्त्वाकांक्षेला बळ देणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
डिसेंबर २०२४ मध्ये केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला ‘फिट इंडिया संडेज ऑन सायकल’ हा उपक्रम आता देशभरातील नागरिकांचा साप्ताहिक उपक्रम बनला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिटनेस का डोस, आधा घंटा रोज’ आणि लठ्ठपणाविरोधातील जनजागृतीच्या संदेशाला या माध्यमातून चालना दिली जात आहे.
मुंबईतील वरळी कोस्टल रोड सायकल ट्रॅक येथे रविवारी सकाळी ६ वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार असून, सहभागी नागरिकांनी सकाळी ५.३० वाजेपर्यंत उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. यावेळी भव्य सायकल रॅली, विविध फिटनेस उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि व्यसनमुक्तीचा संदेश देणाऱ्या या ऐतिहासिक उपक्रमात मुंबईकरांसह सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ‘फिट इंडिया मूव्हमेंट’च्या वतीने करण्यात आले आहे.

Scroll to Top