मुंबई, दि. ८ : राज्यातील लोककलांच्या जतन आणि संवर्धनासाठी विद्यमान लोककला अनुदान योजनेत नमन, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी या चार लोककला प्रकारांचा समावेश करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसेच दशावतारासह लोककला अनुदानाची रक्कम २ कोटी २२ लाख रुपयांवरून ४ कोटी ४० लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विधानसभेत केली.
विधानसभा सदस्य निलेश राणे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री शेलार यांनी सांगितले की, नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या प्रत्येक लोककला प्रकारातील २० कलापथकांना प्रत्येकी ५० हजार रुपये या प्रमाणे वार्षिक १० लाख रुपयांचे अनुदान दिले जाईल.
अनुदानाचा लाभ थेट कलाकारांपर्यंत पोहोचावा यासाठी वाढीव निधीपैकी निम्मी रक्कम कलाकारांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल, तर उर्वरित रक्कम कलापथक चालकांना दिली जाईल. यासंदर्भातील शासन निर्णय पुढील १५ दिवसांत जारी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दशावतार कलाकारांची नोंदणी, जिल्हास्तरावर पडताळणी आणि ओळखपत्र वितरणाची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असून विभागीय अधिकारी यासाठी जिल्हास्तरावर विशेष मोहीम राबवतील. तसेच राजर्षी शाहू महाराज वृद्ध कलाकार मानधन योजनेत पात्र दशावतार कलाकारांचा समावेश करण्याची कार्यवाहीही करण्यात येणार आहे.
राज्यातील भारूड, शंकासूर आणि शक्तीतुरा या लोककलांचे महोत्सव प्रत्येक विभागात आयोजित करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून भजनी मंडळांसाठीची भांडवली साहित्य अनुदान योजना अधिक व्यापक केली जाणार आहे. याशिवाय, दशावतार कलेसाठी राज्य सांस्कृतिक पुरस्कार आणि युवा पुरस्कार योजना सुरू राहणार असल्याची माहितीही मंत्री शेलार यांनी दिली.
दरम्यान, ‘देव खेळ’ या वेब सिरीजमध्ये लोकपरंपरेचा विपर्यास झाल्याच्या तक्रारींची दखल घेऊन संबंधित वेब सिरीजविरोधात पोलिस कारवाई करण्याचे तसेच केंद्र शासनाला याबाबत कळविण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही मंत्री शेलार यांनी सांगितले.




