मुंबई(निलेश घाडगे) : मलबार हिल परिसरातील सिमलानगर येथे घरात घुसून ५५ वर्षीय महिलेचा गळा आवळून खून करत सुमारे ९ लाख रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी करणाऱ्या आरोपीला मलबार हिल पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अटक केली आहे.
या प्रकरणी फिर्यादी एकता प्रशांत जाधव (वय ३८, रा. दहिसर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या आई ज्योती प्रकाश पवार (वय ५५) या सिमलानगर, मलबार हिल येथील राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आल्या. अज्ञात व्यक्तीने जबरी चोरीच्या उद्देशाने त्यांचा गळा आवळून खून केला आणि घरातील सुमारे ९ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता.
या घटनेप्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १०३(१) आणि ३०९(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि इतर पुराव्यांच्या आधारे आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर मोहम्मद कैफ मोहम्मद रफी शेख (वय २३, रा. सिमलानगर, मलबार हिल) याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
या गंभीर गुन्ह्याचा उलगडा मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोज शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त रागसुधा आर. आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुमन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर गोरखे, पोलीस निरीक्षक दिगंबर बिडवे, अब्दूलकादर मलिक तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि तांत्रिक पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करत अल्पावधीत आरोपीला अटक करून खून आणि जबरी चोरीच्या गंभीर गुन्ह्याची उकल केली.



