ताज्या बातम्या

ज्येष्ठ पत्रकार संपादक रमेश झंवर यांचे निधन

कल्याण.. दैनिक लोकसत्ताचे माजी सहसंपादक आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचे माजी कोषाध्यक्ष रमेश गंगाधर झंवर यांचे कल्याण येथील राहत्या घरी शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी अल्पना सोमानी, जावई राकेश सोमानी, नातू डॉ. नंदन, सीए राहुल, नातसून डॉ. संजना सोमानी असा परिवार आहे.
शिल्प तपस्वी पद्मभूषण राम सुतार यांच्या हस्ते मुंबई मराठी पत्रकार संघाच्या प्रतिष्ठेच्या २०२४ च्या आचार्य अत्रे पुरस्काराने झंवर यांना गौरविण्यात आले होते.
झंवर यांनी प्रत्यक्ष आचार्य अत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली दैनिक ‘मराठा’मध्ये काम केले. पन्नास वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत सक्रिय असलेल्या झंवर यांचा दैनिक ‘मराठा’ ते दैनिक ‘लोकसत्ता’ असा सलग प्रवास होता. या कालावधीत उपसंपादक, वार्ताहर, मुख्य उपसंपादक, वृत्तसंपादक, सहसंपादक अशा पदांवर त्यांनी काम केले. दैनिक ‘लोकसत्ता’मध्ये व्यापार उद्योग पुरवणी (कॉमर्स विभाग) व प्रादेशिक विभाग हेही त्यांनी समर्थपणे सांभाळले होते. संपादकीय पानावरील लेख, स्फुट तसेच लोकसत्ताचे अनेक अग्रलेखही त्यांनी लिहिले. निवडणुका, साहित्य संमेलने, देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे त्यांनी वृत्तांकन केले होते.
समाज माध्यमांतील माहितीपूर्ण लिखाणाचा त्यांचा ब्लॉग लोकप्रिय झाल्यावर rameshzawar.co.in ही स्वत:ची वेबसाईट त्यांनी सुरू केली. या साईटलाही देश विदेशात सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला होता. मुंबई मराठी पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष म्हणूनही अनेक वर्षे ते कार्यरत होते.
त्यांची अंत्ययात्रा कल्याण रामबाग येथून उद्या सकाळी 10 वाजता निघेल, असे कुटुंबीयांनी सांगितले.

Scroll to Top