ताज्या बातम्या

सायन रुग्णालयाला अत्याधुनिक बायोकेमिस्ट्री ब्लड अॅनालायझरची भेट; रुग्णांना मिळणार जलद व अचूक निदान सेवा मिळणार – मुख्यमंत्री

मुंबई : सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) उपक्रमांतर्गत मुंबईतील लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे अत्याधुनिक, पूर्णपणे स्वयंचलित बायोकेमिस्ट्री ब्लड अॅनालायझर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या आधुनिक यंत्रणेमुळे रुग्णांना अधिक जलद आणि अचूक निदान सेवा मिळणार असून उपचार प्रक्रियेलाही गती मिळणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आरोग्य क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सर्वसामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हे राज्य शासनाचे प्रमुख ध्येय आहे. इंडियन ऑइलसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी सीएसआरच्या माध्यमातून आरोग्य सेवेसाठी दिलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
सायन रुग्णालय हे मुंबईसह राज्यातील विविध भागांतील हजारो रुग्णांना आरोग्य सेवा पुरवणारे महत्त्वाचे वैद्यकीय केंद्र आहे. येथे दररोज मोठ्या प्रमाणावर रक्त तपासण्या केल्या जात असल्याने प्रयोगशाळेवरील ताण वाढत असतो. नव्याने उपलब्ध झालेल्या उच्च क्षमतेच्या पूर्ण स्वयंचलित बायोकेमिस्ट्री ब्लड अॅनालायझरमुळे तपासणी अहवाल देण्याचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.
ही अत्याधुनिक यंत्रणा मोठ्या प्रमाणावर रक्तनमुने जलदगतीने तपासण्यास सक्षम असून अधिक अचूक आणि विश्वासार्ह अहवाल उपलब्ध करून देईल. त्यामुळे डॉक्टरांना उपचारांबाबत तातडीने निर्णय घेणे शक्य होणार असून रुग्णांच्या निदान प्रक्रियेला गती मिळेल. विशेषतः आपत्कालीन परिस्थितीतील रुग्णांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी शासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध कॉर्पोरेट संस्थांमधील सहकार्य महत्त्वाचे असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे समाजातील वंचित आणि गरजू घटकांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या प्रयत्नांना बळ मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सायन रुग्णालयात उपलब्ध झालेल्या या आधुनिक वैद्यकीय उपकरणामुळे प्रयोगशाळेची कार्यक्षमता वाढणार असून रुग्णांचा प्रतीक्षाकाल कमी होईल. परिणामी, आरोग्य सेवांची गुणवत्ता आणखी उंचावण्यास मदत होणार आहे.

‌‌

Scroll to Top