ताज्या बातम्या

ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ५१ शाळांतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व कपड्यांचे वाटप

अकोले : राज्याचे जलसंधारण मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनाठायी खर्चाला फाटा देत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व दैनिक समर्थ गांवकरी समूहाच्या वतीने चितळवेढे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी सामाजिक बांधिलकीचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत तब्बल ५१ शाळांतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, कपडे तसेच गोड खाऊचे वाटप करण्यात आले. युवा नेते चंद्रशेखर आरोटे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमात बोलताना पालक समितीचे अध्यक्ष संजय आरोटे यांनी विखे परिवाराने गेल्या चार पिढ्यांपासून समाजसेवेची परंपरा जपल्याचे सांगितले. वाढदिवसानिमित्त फुलांचे गुच्छ, सत्कार व इतर अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्याचा उपक्रम हा समाजासाठी आदर्शवत असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यभरातील कार्यकर्त्यांनीही अशा प्रकारचे विधायक उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्राला बळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा संदेश दिला. कोंभाळणे परिसरातील काही विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमातील शाळांमधून जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्याची बाब विशेष कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी आपल्या मनोगतात पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना कायम जपल्याचे सांगितले. गेली २५ ते २६ वर्षे पत्रकारिता करत असताना समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून ज्ञानमंदिरात विद्यार्थ्यांच्या रूपाने उद्याचे सक्षम नागरिक घडत असतात. विद्यार्थ्यांना दिलेली एक वही, एक पेन किंवा एक दप्तरदेखील त्यांच्या उज्ज्वल भवितव्याला दिशा देणारे ठरू शकते, असे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमाअंतर्गत सुमारे ५१ शाळांतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व कपड्यांचे वितरण करण्यात आले. यासोबतच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्यही महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ सातत्याने करत असल्याचे डॉ. आरोटे यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमास पालक समितीचे अध्यक्ष संजय आरोटे, युवा नेते चंद्रशेखर आरोटे, मुख्याध्यापक जगन्नाथ झडे, सहशिक्षक पी. टी. पवार, सहशिक्षिका शैला देशमुख, ज्योती भोसले, पालक सुदाम दगडू आरोटे, नारायण मोहटे, गीताराम उघडे, सात्विक आरोटे, मिथुन डावरे, नारायण चव्हाण, नवनाथ चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Scroll to Top