मुंबई(रमेश औताडे) : बेस्ट प्रवासी आणि कामगारांच्या हिताकडे दुर्लक्ष करून कंत्राटदारांच्या फायद्याचे निर्णय घेतले जात असल्याचा आरोप करत, अशा धोरणांना पाठिंबा देणाऱ्या सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधात सर्व कामगार संघटना एकत्रितपणे १८ जून पासून तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने दिला. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत हा इशारा दिला.
ऍड.उदयकुमार अनंत आंबोणकर, पवन गायकवाड, कॉ. विजय कुलकर्णी, कॉ. बशीर अहमद, कॉ. हरीश गायकवाड, गजानन नागे, नितीन पाटील, गौरीशंकर खोत, विलास पवार व इतर संघटनांचे नेते यावेळी समितीच्या झेंड्याखाली राजकारण सोडून कामगारांच्या व प्रवाशांच्या हितासाठी एकत्र आले आहेत.
बेस्टचा क अर्थसंकल्प महापालिकेच्या अ अर्थसंकल्पात विलीन करा, निवृत्त कामगारांची कायदेशीर देणी एकरकमी द्या, २०१६ ते २०२६ चा वेतन करार ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे थकबाकीसह द्या, बेस्टचे परिवहन व विज विभागाचे कंत्राटीकरण रद्द करून वेटलिज कामगारांना बस सह बेस्ट मध्ये सामावून घ्या, बेस्टच्या स्वः मालकीच्या ५००० बस आणा, आवश्यक कामगार भरती करा, जेष्ठ कर्मचाऱ्यांना सेवाजेष्ठतेने पदोन्नत्या द्या, बेस्ट उपक्रमाच्या मालमत्ता लाँग लिज अथवा अन्य मार्गाने विकू नका, पी.पी.पी. मॉडेल ऐवजी सेल्फ डेव्हलपमेंट स्विकारा अशा विविध मागण्या बेस्ट उपक्रमातील विविध कामगार संघटनांनी एकत्रीत येत बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीची स्थापना करून बेस्ट व महानगरपालिका प्रशासन आणि राज्य शासना समोर मांडल्या आहेत. मात्र अद्याप काहीच कार्यवाही नाही.




