मुंबई : महाराष्ट्रातील परिवहन व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि लोकाभिमुख करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेणाऱ्या परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या कार्यअहवालावर आधारित कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते करण्यात आले. मंत्रालयात आयोजित मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री उपस्थित होते.
या पुस्तकामध्ये परिवहन विभाग आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत गेल्या काळात राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांचा, सुधारणा उपक्रमांचा आणि लोकाभिमुख निर्णयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या जनजीवनाशी घट्ट नाते असलेल्या ‘लालपरी’ अर्थात एसटी सेवेला अधिक बळकटी देण्यासाठी महसूलवाढ, इंधन बचत, ई-बस उपक्रम, तांत्रिक आधुनिकीकरण, कर्मचारी कल्याण आणि प्रवासी सुविधांच्या उन्नतीसाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांची माहिती या कॉफी टेबल पुस्तकातून देण्यात आली आहे. तसेच वाहन परवाना व नोंदणी प्रक्रियेत डिजिटल पारदर्शकता, स्वयंचलित वाहन चाचणी केंद्रांची उभारणी, रस्ते सुरक्षा जनजागृती मोहिमा, वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकाभिमुख सुधारणा यांचाही समावेश करण्यात आला आहे.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन विभागाच्या कार्याची प्रशंसा करत राज्यातील नागरिकांना सुरक्षित, सुलभ आणि विश्वासार्ह प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही एसटी महामंडळ आणि परिवहन विभागाने लोकसेवेला केंद्रस्थानी ठेवून केलेल्या कामांचा गौरव केला.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितले की, हा कार्यअहवाल केवळ योजनांचा किंवा आकडेवारीचा दस्तऐवज नसून महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास, कर्मचाऱ्यांचे समर्पण आणि आधुनिक परिवहन व्यवस्थेच्या उभारणीचा प्रवास आहे. “प्रवास सुरक्षित… महाराष्ट्र प्रगत” या ध्येयाने परिवहन विभाग पुढेही जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रकाशन सोहळ्यानंतर उपस्थित मान्यवरांनी पुस्तकाचे अवलोकन करत परिवहन क्षेत्रातील विविध उपक्रमांचे कौतुक केले.




