ताज्या बातम्या

अणुशक्तीनगर विधानसभा क्षेत्रात उबाठा गटाला मोठा धक्का; रोहिदास ढेरंगे यांची शिवसेनेत घरवापसी

मुंबई : दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील अणुशक्तीनगर विधानसभा क्षेत्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, उपविभागप्रमुख रोहिदास ढेरंगे यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. ठाणे येथील निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात ढेरंगे यांनी भगवा झेंडा हाती घेत पक्षात अधिकृत घरवापसी केली.
यावेळी महिला शाखा संघटिका लता करांडे, शाखा क्रमांक १४२ मधील १५ उपशाखाप्रमुख, युवासेना पदाधिकारी तसेच अनेक शिवसैनिकांनीही शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना उपनेते व महासचिव राहुल शेवाळे यांनी रोहिदास ढेरंगे व सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अणुशक्तीनगर परिसरात संघटन बांधणी, जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांशी असलेल्या जवळिकीमुळे रोहिदास ढेरंगे यांची ओळख प्रभावी नेतृत्व म्हणून आहे. त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद या भागात आणखी वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Scroll to Top