ताज्या बातम्या

डॉ.संदीप डाकवे यांना राज्य शासनाच्या व्यसनमुक्ती पुरस्काराबद्दल मानपत्र प्रदान

तळमावले : महाराष्ट्र शासनाचा अत्यंत मानाचा ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ मिळाल्याबद्दल प्रसिद्ध चित्रकार व पत्रकार डॉ. संदीप डाकवे यांना श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्था, कराड यांच्या वतीने विशेष नागरी सत्कार करून मानपत्र प्रदान करण्यात आले. स्व.सौ.वेणूताई चव्हाण स्मृती मराठी साहित्य संमेलनांतर्गत आयोजित ‘साहित्यिक स्नेहमेळावा’ प्रसंगी हा गौरव सोहळा हॉटेल अलंकार, कराड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाला डॉ.संदीप डाकवे हे उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, त्यांच्या वतीने त्यांचे स्नेही व मित्र प्रशांत लाड आणि प्रमोद तोडकर यांनी उपस्थित राहून हे सन्माननीय मानपत्र, सन्मानचिन्ह आणि बुकेसह सत्कार स्वीकारला.

सदर सोहळ्याचे अध्यक्षस्थान सातारा येथील ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी भूषविले, तर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या राज्यशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख प्रा. (डॉ.) भारती पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

संदीप डाकवे यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी कार्याची दखल घेऊन त्यांना राज्य शासनाने सन्मानित केले आहे. या स्नेहमेळाव्यात त्यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे नेटके नियोजन संस्थेचे चेअरमन राजन वेळापुरे, कालिका कुटुंब प्रमुख मुनीर बागवान (सावकार) व निमंत्रक प्रा. अशोक चव्हाण यांनी केले होते. या गौरव सोहळ्यास तालुक्यातील साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Scroll to Top