मुंबई : बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून होत असलेल्या अव्यावसायिक स्पर्धेविरोधात ऑल इंडिया ऑर्गनानेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रॅगिस्ट (AIOCD) ने २० मे २०२६ रोजी देशव्यापी औषध विक्रेते बंदची घोषणा केली आहे. संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी ही माहिती दिली.
संघटनेच्या मते, औषध व्यवसाय हा ड्रग्ज अँड के ऍक्ट 1940 अंतर्गत नियंत्रित असला तरी ऑनलाईन औषध विक्रीबाबत अद्याप स्पष्ट कायदेशीर तरतूद नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने ऑनलाईन औषध विक्रीवर स्थगिती दिलेली असतानाही देशभरात सर्रासपणे ऑनलाईन विक्री सुरू असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
कोरोना काळात होम डिलिव्हरीसाठी देण्यात आलेल्या विशेष सवलतीचा गैरफायदा घेत ऑनलाईन कंपन्या २० ते ५० टक्के सवलत देत बाजारपेठ ताब्यात घेत असल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे देशातील सुमारे १२.५० लाख औषध विक्रेत्यांचा व्यवसाय धोक्यात आल्याचे संघटनेने म्हटले आहे.
राज्य संघटनेचे सचिव अनिल नावंदर,पदाधिकारी हुकुमराज मेहता यांनी महाराष्ट्रात हा बंद शंभर टक्के यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला. सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.




