सातारा(अजित जगताप) : उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. त्याचा जीवनमान व आहारावर मोठा परिणाम
झाला आहे. यामुळे आता लोकांना आरोग्यदायक फळ खाल्ल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे आरोग्यवर्धक अननस फळाला आता मोठी मागणी असून सातारा जुना आर.टी.ओ. कार्यालय चौकातच झाडाच्या सावलीमध्ये शेजारी अननस घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे. दररोज किमान ३०० ते ४०० नग अननसचे विक्री होत असल्याची माहिती श्री प्रभू व सलमान बागवान यांनी दिली आहे.
सातारा जिल्ह्यात कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात अननस दाखल झालेले आहेत. अननसच्या गुणवत्तेनुसार पन्नास रुपये ते दोनशे रुपये अननस विक्री होत आहे. थंड बर्फावर अननस ठेवल्यास एक फोड दहा ते वीस रुपयाला मिळते.अननस हे केवळ चविष्ट नसून आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी उष्णकटिबंधीय फळ आहे. यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि विशेष एन्झाइम्स असतात.
अननसात ‘ब्रोमेलेन’ नावाचे एन्झाइम असते, जे प्रथिने तोडण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करते. हे बद्धकोष्ठता आणि पोटाची सूज कमी करण्यास उपयुक्त आहे.
हे व्हिटॅमिन ‘सी’ चा उत्तम स्रोत आहे, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि संसर्गाशी लढण्यास मदत होते.
व्हिटॅमिन ‘सी’ आणि अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचेला उजाळा मिळतो आणि मुरुमांची समस्या कमी होण्यास मदत होते.
अननसातील अँटीऑक्सिडंट्स हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.अननस जास्त आम्लधर्मी असू शकते, त्यामुळे रिकाम्या पोटी खाल्ल्यास छातीत जळजळ होऊ शकते. ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे, त्यांनी हे फळ मर्यादित प्रमाणात खावे किंवा वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्यानेच घ्यावे असे सांगण्यात आले आहे. आंब्याची फोड लागते गोड असे म्हणतात त्याप्रमाणे गरिबांचे आंबे म्हणून अननस सध्या अनेकांच्या आहारामध्ये मुख्य सूत्र ठरले आहे. विटा सोबत आणूनच खाल्ल्यास त्याची चव दिवसभर जिभेवर रेंगाळत असते. अशी माहिती नियमितपणाने अननस खाणारे संजय कदम, सूर्यकांत पाटणकर व दत्ता पवार यांनी दिली.
————————————————-
फोटो– सातारा शहरात जुना आरटीओ या ठिकाणी अननस मोठ्या प्रमाणात दाखल (छाया– निनाद जगताप सातारा )




