कोरेगाव (अजित जगताप) : कोरेगाव दि: तीन तालुक्याचा विस्तार असलेल्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर कोरेगावचे अभ्यासू राजकारणी राजाभाऊ बर्गे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या जोरदार शक्ती प्रदर्शनाने भविष्यात कोरेगावचे शिवसेनेचे उमेदवार म्हणून आतापासूनच त्यांच्या कामकाजाला सुरुवात झाल्याचे मानण्यात येत आहे. मुख्यमंत्री पदावर असताना एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरविकास मंत्रालयाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी दिला होता. विधानसभेच्या निवडणुकीतही प्रचारासाठी ते आले होते. कोरेगाव शहरातील विकासकामे प्रलंबित न राहता ती तातडीने पूर्ण व्हावीत यासाठी आणखी निधी देण्यास सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा येथील गांधी मैदानावर झालेल्या जाहीर सभेत दिली. तसेच राजाभाऊ बर्गे यांच्याशी व्यासपीठावरच संवाद साधला. या वेळेला सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, संपर्कप्रमुख शरद कणसे, आमदार बाबर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी विकासकामांसाठी पुढाकार घ्यावा, त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी परिश्रम घ्यावेत. त्यांचा निश्चितच पक्ष विचार करेल. असेही उपमुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले . त्यामुळे २०२९ साली होणाऱ्या कोरेगाव विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून आतापासून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. सातारा कोरेगाव व खटाव तालुक्यातील कोरेगाव मतदार संघात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. दरबार हॉटेलच्या माध्यमातून गुणवत्ता व आपलेपणा यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली असून शिवसेना वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
सातारच्या गांधी मैदानावर सोमवारी रात्री झालेल्या जाहीर सभेत प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. तेव्हापासून शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्याचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी जाहीररीच्या मी माझ्या जीवावर निवडून येतो असे सांगून शिवसेनेच्या नेत्यांना डिवचले आहे. त्यामुळे कोरेगाव मतदार संघातील शिवसैनिक आता सह व्याज परतफेड करण्यासाठी आतापासूनच कामाला लागले आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख हनुमंतराव जगदाळे, संपर्कप्रमुख शरद कणसे व मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले. श्री बर्गे यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार महेश शिंदे यांच्यासाठी जोरदार प्रचार केला होता. आता श्री बर्गे हे अधिकृत शिवसैनिक झालेले आहेत. त्यांच्याशी संवाद साधताना शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कोरेगाव शहरासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. एक प्रकारे त्यांना ताकद देण्याचा शुभारंभ करण्यात आला.
विकासकामांचे प्रस्ताव तातडीने सादर करा. नगर विकास मंत्रालयाबरोबरच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही कोरेगाव शहरासाठी जास्तीत जास्त निधी दिला जाईल, असे शिंदे यांनी सांगितले. तसेच, राजाभाऊ बर्गे यांनी प्रभागनिहाय विकासकामांचे प्रस्ताव तयार करून पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे सादर करावेत. ते प्रस्ताव माझ्याकडे पाठवा, मी त्यांना तत्काळ मंजुरी देईन, असेही त्यांनी नमूद केले.
महायुती सरकारच्या कार्यकाळात कोरेगाव शहराचा विकासाभिमुख कायापालट झाला आहे . याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. मी रडणारा नव्हे तर लढणारा शिवसैनिक आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेने दिलेली जबाबदारी समर्थपणाने पार पाडण्यासाठी श्री राजाभाऊ बर्गे आतापासूनच कामाला लागले असून कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे वाढवण्यासाठी ते निश्चितच प्रयत्न करतील. असा विश्वास नव्या व जुन्या शिवसैनिकांना वाटू लागलेला आहे. सध्या ठेकेदारांच्या गराड्यात लोकप्रतिनिधी असल्यामुळे कोरेगाव विधानसभेच्या निवडणुकीत नव्याचर्याला मतदार संधी देतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
________________________ फोटो— कोरेगावचे नेते राजाभाऊ बर्गे यांच्याशी संपर्क साधताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई, संपर्कप्रमुख शरद कणसे (छाया– अजित जगताप, सातारा)




