सातारा(अजित जगताप) : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा व्हिप झुगारून तीन सदस्यांनी भाजपला मतदान केले होते. यावेळी मोठा संघर्ष झाला होता. या विरोधात राष्ट्रवादीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती .या तक्रारीची पहिली सुनावणी बुधवार दिनांक २२ एप्रिल रोजी दुपारी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सदर घटना नंतर तब्बल एक महिन्याने पुन्हा एकदा त्या तीन सदस्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या दिनांक २० मार्च रोजी दुपारी निवडणुक होती. यावेळी झालेले अपहरण नाट्य ताजे असताना राष्ट्रवादीचे तीन सदस्य कामेश कांबळे ,लता कर्णे व ऋतुजा जगताप हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून येऊन सुद्धा त्यांनी निष्ठापूर्वक भाजपला अपेक्षित मतदान केले. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते व जिल्हा परिषद सदस्य उदय कबुले यांनी संबंधित सदस्यांना अपात्र करण्याची लेखी तक्रार सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या वेळेला तीन सदस्य व तक्रारदार श्री. कबुले यांच्यासोबत कायद्याचा अभ्यास असणारी वकील मंडळी व त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. तर सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील कॅन्टीनमध्ये अनेक पत्रकार गारव्याचा आस्वाद घेत होते. दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणीला तीन सदस्यांना दालनात बोलून घेतले. त्यांना पारदर्शक कायद्याप्रमाणे दि. २९ एप्रिल रोजी आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आलेली आहे. या प्रक्रियेला विलंब लागू नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वकील अँड .दत्तात्रय घोडके यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिप सुनावनी प्रक्रिया ९० दिवसाच्या आत पूर्ण करावी असा विनंती अर्ज दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत संदर्भात झालेल्या या घटनेची सुनावणी तारीख पे तारीख न होता ती लवकर व्हावी. अशी राजकीय कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. विलंबाने मिळालेला न्याय हा सुद्धा अन्याय असतो. अशी चर्चा रंगू लागलेली आहे. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सुनावणी झाल्यामुळे राजकीय पक्षाचे मतभेद बाजूला ठेवून सुनावणीला उपस्थित असलेल्या सर्व सातारा जिल्हा परिषद सदस्य व वकील मंडळी आणि त्यांच्या समर्थकांनी चहापान घेतला. आणि वातावरणातील कडक उन्हाळा थोडा थंड करण्यात यश मिळवले. सातारा जिल्हा परिषदेच्या कामकाज पाहताना सातारा जिल्ह्याचा विकास हा महत्त्वाचा आहे. यामध्ये राजकारण आणू नये. असा संदेश बहुदा उपस्थित दोन्ही पक्षातील जिल्हा परिषद सदस्यांनी दिला आहे. अशी चर्चा रंगू लागलेली आहे. व्हिप डावल्यामुळेच काही सदस्यांना जिल्हा परिषदेमध्ये संधी मिळालेली आहे त्या संधीचे त्यांनी सोनं करावं अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. . ….. ……… ……………. फोटो –सातारा जि प व्हिप बाबत सुनावणीला आलेले जि. प. सदस्य (छाया– अजित जगताप, सातारा)
साताऱ्यात जि. प. व्हिप बाबत खेळीमेळीत सुनावणी…
April 23, 2026 / 2 minutes of reading




