मुंबई : सदिच्छा सामाजिक विकास संस्था, माटुंगा लेबर कॅम्प, धारावी यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांसाठी जीवनगौरव, समाजभूषण, समाज गौरव, कलाविष्कार गौरव तसेच धम्म प्रेरणा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
गेली अनेक वर्षे संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असून, समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्याची परंपरा जोपासत आहे. यावर्षी संस्थेचे १३ वे वर्ष असून, संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय कैलास वाशी व सुनील कांबळे यांच्या सामाजिक कार्याला अभिवादन करत हा कार्यक्रम त्याच जोशात आयोजित करण्यात येत आहे.
यंदाचे पुरस्कार मानकरी पुढीलप्रमाणे — जीवनगौरव पुरस्कार : उत्तम बापू वाघमारे, समाजभूषण पुरस्कार : आशिष वसंत मोरे व अनिल शिवराम कासारे, समाज गौरव पुरस्कार : प्रकाश बाळकृष्ण सुर्वे (बौद्धाचार्य), कलाविष्कार गौरव पुरस्कार : विजय विनायक दिवे, तर धम्म प्रेरणा पुरस्कार : आयुष्यमती ज्योती दीपक सावंत व आयुष्यमती सुनिता ताई रवींद्र जाधव यांना जाहीर झाले आहेत.
सदर कार्यक्रम शनिवार, २५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉल समोरील मैदान, माटुंगा लेबर कॅम्प येथे आयोजित करण्यात आला असून, प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.




