सातारा(विजय जाधव) : ग्रामविकासाची धुरा सक्षमपणे सांभाळणाऱ्या सरपंचांना संघटित करत राज्यभर चळवळ उभारणारे नागझरी (कोरेगाव) येथील माजी सरपंच जितेंद्र भोसले यांनी अखेर शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. रविवारी दि.१९ एप्रिल रोजी साताऱ्यातील गांधी मैदानावर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
सरपंच परिषद, पुणेचे अध्यक्ष असलेल्या जितेंद्र भोसले यांची शिवसेनेच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली असून पक्षवाढीची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. २०१७ पासून राज्यभरातील शेकडो सरपंचांना एकत्र आणत त्यांनी ‘सरपंच परिषद’च्या माध्यमातून मजबूत संघटन उभे केले आहे.
लोकसहभागातून जलसंधारण आणि ‘जलयुक्त गाव’ संकल्पना राबवत नागझरी गावाला नवी ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. गावविकास आणि सरपंचांच्या प्रश्नांसाठी आता सत्तेच्या प्रवाहात राहून काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
नवनियुक्त प्रवक्ते जितेंद्र भोसले यांनी “विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. शेकडो सरपंच आता पक्षवाढीसोबतच गावांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहेत.” अशी ग्वाही दिली.
सातारा जिल्ह्यासह राज्यभरात विस्तारलेल्या सरपंच परिषदेतील सरपंच भगव्या झेंड्याच्या खाली आल्याने शिवसेनेची ताकद वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
सक्षम नेतृत्वाला कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी
जितेंद्र भोसले यांनी सरपंच परिषद, पुणे ची स्थापना केली. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील सरपंच या परिषदेच्या छत्राखाली एकवटले आहेत. यातून सरपंचांना भरीव मानधन योजना, कार्यकाल संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून विद्यमान सरपंचांची नियुक्ती करण्यास शासनाला कायदेशीर तरतुदींनुसार भाग पाडले. वेळोवेळी सरपंच, सदस्यांवर जिथे अन्याय तिथे खंबीरपणे उभे राहून लढा देणाऱ्या जितेंद्र भोसले यांच्यातील नेतृत्व गुण ओळखून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेने सोबत चला, विकासासाठी सोबत राहू या, सांगितले. यावर परिषदेच्या सदस्यांनी गावाच्या विकासासाठी सत्तेसोबत प्रवाहात राहून गावाच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. साताऱ्यात पक्ष प्रवेश आणि त्याच क्षणी शिवसेना प्रवक्ते म्हणून नियुक्ती केली. यातूनच सक्षम नेतृत्वाने राज्यात शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे.




