कराड(प्रताप भणगे) : शहरात नगरपालिका प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू असताना, दुसरीकडे फूटपाथवरच वाहनांचे पार्किंग होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. त्यामुळे पादचाऱ्यांसाठी बनवलेले फूटपाथच आता पार्किंगचे अड्डे बनले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
कराड शहरातील प्रमुख रस्त्यांलगत असलेल्या फूटपाथवर दुचाकी व चारचाकी वाहनांचे बेकायदेशीर पार्किंग सर्रासपणे होत आहे. परिणामी, पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालण्याची वेळ येत असून अपघाताचा धोका वाढला आहे. “आम्ही चालायचं तरी कुठे?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नगरपालिका प्रशासन अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेत व्यस्त असताना, फूटपाथवरील या पार्किंग समस्येकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याची टीका नागरिक करत आहेत. अनेक ठिकाणी दुकानदार आणि वाहनचालकांनी फूटपाथचा वापर पार्किंगसाठी सुरू केल्याने सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांनी प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन फूटपाथ मोकळे करून पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे.




