नवी मुंबई

: भारताचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त श्री समर्थ क्लासेस, कोपर खैरणे येथे विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भिमराव धुळप (संपादक, धगधगती मुंबई वृत्तमिडिया), रमेश संकपाळ सर (अध्यक्ष, सुयश सामाजिक व शैक्षणिक संस्था), अंकुशशेठ संकपाळ (सचिव, सुयश सामाजिक व शैक्षणिक संस्था) तसेच लक्ष्मणदादा कदम (सामाजिक कार्यकर्ते) उपस्थित होते.
यावेळी संपादक भिमराव धुळप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेले उच्च शिक्षण, त्यांनी केलेला प्रचंड संघर्ष आणि शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व यावर सविस्तर भाष्य केले. “यापुढे शिक्षणाशिवाय पर्याय नाही,” ही जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण करत त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचे भविष्य घडवण्याचे आवाहन केले.
तसेच, बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका जातीपुरते मर्यादित नसून सर्व धर्मीय आणि सर्व समाजघटकांसाठी त्यांनी भारतीय संविधानाची निर्मिती केली, यावर त्यांनी विशेष भर दिला. “आज आपला देश संविधानाच्या बळावर चालत आहे आणि जोपर्यंत सूर्य व चंद्र आहेत, तोपर्यंत हीच राज्यघटना देशाला दिशा देत राहील,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
यावेळी रमेश संकपाळ सर यांनी देखील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत शिक्षण, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोरखनाथ घाडगे सर यांनी केले. तर
कार्यक्रमाचा समारोप संचालक विष्णु शिंदे सर यांनी आभार प्रदर्शन करून केला.




