ताज्या बातम्या

मुंबईत शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

मुंबई, (दि.२ एप्रिल) : शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या मुंबई कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर उत्साहात संपन्न झाले.
या कार्यक्रमाला उरणच्या नगराध्यक्षा तथा प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष भावनाताई घाणेकर, अध्यक्ष राजाराम बुवा शेलार, सचिव एच. बी. जंगम, शालिनीताई म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना शशिकांत शिंदे यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले. “प्रत्येक तालुक्यात संगीत विद्यालय सुरू करण्याचा संकल्प स्तुत्य असून आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या मार्गदर्शनामुळे अशा उपक्रमांना बळ मिळते. आमचा पक्ष प्रतिष्ठानच्या पाठीशी कायम उभा राहील,

” असे त्यांनी सांगितले.
उरण नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर यांनी प्रतिष्ठानची माहिती देत उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बॅलार्ड पीयर येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात ही जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल पक्षाचे नेते जयंत पाटील (भाई) तसेच चिटणीस ॲड. राजू कोरडे यांचे आभार अध्यक्ष राजाराम शेलार (बुवा) यांनी मानले.
राज्यातील कलाकारांच्या अडचणी सोडवणे तसेच प्रतिष्ठानचे उद्देश, ध्येय व धोरण गावपातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी या कार्यालयातून कामाची सुरुवात करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Scroll to Top