प्रतिनिधी : लोकसभा निवडणूक २०२४ चे निकाल काल जाहीर झाले. दक्षिण मध्य मुंबईतून धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. दक्षिण मध्य मुंबईत शिवसेना शिंदे गटाचे राहुल शेवाळे आणि ठाकरे गटाचे अनिल देसाई यांच्यात सामना होता. राहुल शेवाळे हे २०१४ पासून या लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. अनिल देसाई हे दोन टर्मपासून राज्य सभेवर खासदार आहेत. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख आहे. २०२२ मध्ये शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. त्यावेळी राहुल शेवाळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. राहुल शेवाळे यांच्यासाठी तुलनेने ही सोपी लढाई मानली जात होती. मागच्या दोन टर्मपासून राहुल शेवाळे खासदार होते. मतदारसंघात त्यांचा तगडा जनसंपर्क होता. तुलनेने अनिल देसाई यांचा चेहरा मतदारसंघात फार ओळखीचा नव्हता. जनसंपर्क तेवढा नव्हता. राहुल शेवाळे हे खासदार होण्याआधी नगरसेवक होते. त्यामुळे राहुल शेवाळे हे सहज विजयी होतील असा अंदाज होता.
दक्षिण मध्य मुंबईत अणुशक्तीनगर, चेंबूर, धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहीम हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. अणुशक्ती नगरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक आमदार आहेत. चेंबूरमध्ये ठाकरे गटाचे प्रकाश फातर्पेकर आमदार आहेत. धारावीमधून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आमदार आहेत. सायन कोळीवाड्यातून भाजपाचे कॅप्टन तामिळ सेल्वन आमदार आहेत. वडाळ्यामधून भाजपाचे कालिदास कोळंबकर आणि माहिममधून शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर आमदार आहेत. या लोकसभा क्षेत्रात महायुतीचे चार आणि मविआचे दोन आमदार होते. पक्षीय बलाबलमध्ये राहुल शेवाळे यांची बाजू वरचढ होती. पण तरीही ते हरले.
‘या’ तीन भागातून ठाकरे गटाला सर्वाधिक मतदान
मुस्लिम बांधवांचे मतदान मशाली ला
राहुल शेवाळे यांच्यासाठी पहिल्या फेरीची मतमोजणी समाधानकारक होती. त्यांना २०४२० मत मिळाली होती. अनिल देसाई यांना १८८०७ मत मिळाली होती. पण दुपार होईपर्यंत अनिल देसाई यांची आघाडी ५० हजारपर्यंत गेली. शेवाळे यांच्या पराभवाच चित्र स्पष्ट होत गेले. माहिम विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक ५७.९७% टक्के मतदान झाले होते. वडाळ्यातून ५७.११% मतदान झाले होते. धारावीमधून सर्वात कमी ४८.५२% टक्के मतदान झाले होते. अणुशक्ती नगर, चेंबूर आणि धारावी या तीन भागातून अनिल देसाई यांना सर्वाधिक मताधिक्य मिळाले. त्यामुळे अनिल देसाई यांचा विजय सोपा झाला. आणि राहुल शेवाळे यांचा पराभव झाला.
आणखी एक महत्वाचे कारण समोर आले,मागील १० वर्षात शेवाळे यांनी या मतदार संघात कोणते असे मोठे काम केले,हे सर्वसामान्य मतदार विचारत होते. धारावीतील जन्म असलेल्या राहुल शेवाळे यांना स्वतः चर्मकार असूनही एकादे “रोहिदास भवन” बांधले नाही.याचा ही राग मतदारांना होता.तो त्यांनी यावेळी मतपेटीतून व्यक्त केला. आणखी कारण सांगायचे झाले तर मुस्लिम बांधवानी भरभरून महाविकास आघाडीला म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या मशाली ला मतदान केले. हे चित्र संपूर्ण मुंबईत बघायला मिळाले याचा फटका महायुतीला झाला असल्याचे जाणकारांचे मत आहे.
.