नवी मुंबई : ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रात लागणाऱ्या सुख सुविधांसाठी नवी मुंबई महानगरपालिका येणाऱ्या अंदाजपत्रकात तरतूद करून सर्व प्रकारचे सहकार्य करीन असे स्पष्ट उद्गार नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी जाहीर सभेत काढले.
ज्येष्ठ नागरिक संघ सानपाडा आणि महावीर इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने २९ मार्च २०२६ रोजी सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाले. याप्रसंगी महापौर सुजाता पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ज्येष्ठांचा सन्मान व बालकांवर प्रेम करणे, महत्त्वाचे आहे. मी जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्राला भेट देते. त्यांचे आशीर्वाद महत्त्वाचे आहेत. त्यांची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. अशा प्रकारची आरोग्य शिबिरे घेऊन ज्येष्ठांची सेवा करता, हे ज्येष्ठ नागरिक केंद्राचे उत्तम कार्य आहे. असे मला वाटते. आपल्या समाजकार्याला शुभेच्छा.
उपमहापौर दशरथ भगत यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्व सोयीनेयुक्त असे चांगले विरंगुळा केंद्र असले पाहिजे. मुलांसाठी खेळाचे मैदानही असले पाहिजे आणि ज्येष्ठांसाठी उद्यानही असले पाहिजे, परंतु खेळाचा त्रास ज्येष्ठांना होणार नाही, याची काळजी आपण घेऊ. त्यासाठी लवकरच उद्यानात ज्येष्ठांच्या संरक्षणासाठी जाळी बसवली जाईल. विरंगुळा केंद्राला लागणाऱ्या सुविधांचा पाठपुरावा करा, आम्ही निश्चितच आपणास मदत करू. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव यांनी सांगितले की, विरंगुळा केंद्र कायमस्वरूपी करावीत. सिताराम मास्तर उद्यानात नाना नानी पार्क करावे. वरिष्ठ नागरिकांना खेळाच्या मैदानातील चेंडूपासून संरक्षण मिळावे, विरंगुळा केंद्राला सुख सुविधा मिळाव्यात. वरिष्ठांना शासकीय योजना मिळण्यासाठी सहकार्य करावे . केंद्रात नवी मुंबई बस वाहतुकीचे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी सहकार्य करावे. फेसकॉमचे मुंबई / नवी मुंबईचे अध्यक्ष सुरेश पोटे यांनी नवी मुंबईत गाव तेथे विरंगुळा केंद्र या धरतीवर वॉर्ड तेथे विरंगुळा केंद्र देण्यात यावे अशी मागणी केली. याप्रसंगी नगरसेवक भाऊ भापकर, शिल्पा ठाकूर, महावीर इंटरनॅशनलचे आंतरराष्ट्रीय संचालक डॉ. बळवंत चोरडिया, नवी मुंबईचे अध्यक्ष मनीष जैन आदी मान्यवरांनी शुभेच्छापर भाषणे केली. कार्यक्रमास नवी मुंबई रिटेल केमिस्ट अँड होलसेलर्स असोसिएशनचे अभंग, महावीर इंटरनॅशनलचे कमिटी मेंबर्स, सानपाडा जेष्ठ नागरिक संघाचे आजी माजी पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आरोग्य शिबिरात जवळजवळ १०० नागरिकांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे निवेदन संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव आणि सचिव जगदीश एकावडे यांनी केले, शिबिर यशस्वी करण्यासाठी संघाचे उपाध्यक्ष लक्ष्मण गोळे, खजिनदार महादेव पाटील, सहसचिव राजेंद्र कदम, कमिटी मेंबर्स जे.पी. देसाई, मंगला मानधने, राजाराम घोलप, अमोल शेजाळे यांनी विशेष परिश्रम घेतले. सुरुवातीला पाहुण्यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.




