मुंबई(शांताराम गुडेकर/समीर खाडिलकर ) : वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू बांधकाम प्रकल्पामुळे मच्छीमार बांधवांच्या होणाऱ्या नुकसान भरपाईसंदर्भात मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री.नितेश राणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.तसेच या बैठकीस माजी आमदार किरण पावसकर यांनी मंत्री महोदयासमोर काही मागण्या मांडल्या पुढीलप्रमाणे १)वर्सोवा – वांद्रे सागरी सेतू बांधकाम प्रकल्प जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत माहीम मच्छीमारांना वन टाइम सेटलमेंट न देता प्रत्येक वर्षी नुकसान भरपाई देण्यात यावी.२)वरळी मच्छीमारांना बी.एम.सी. ने ज्याप्रमाणे नुकसान भरपाई दिली, त्याच धर्तीवर माहीम मच्छीमारांनाही नुकसान भरपाई देण्यात यावी.३) दि.०९ मार्च २०२३ च्या शासन निर्णयामध्ये वर्सोवा – वांद्रे सागरी सेतू बांधित मच्छीमाऱ्यांच्या प्रत्येक घरातील एकाच बोटीला नुकसान भरपाई मिळेल. हे सुधारित करून (घरामागे न देता रजिस्टर असलेल्या प्रत्येक बोटीला नुकसान भरपाई देण्यात यावी.) या प्रमुख मागण्या मांडल्या.
तसेच सन्माननीय उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री असताना सह्याद्री अतिथी ग्रह येथे संयुक्त बैठक घेऊन वरळी कोळीवाड्यातील मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळवून दिली. त्याच बैठकीला शिंदे साहेबांनी विशेष बाबमध्ये माहीम मच्छीमारांनाही नुकसान भरपाई देण्यात यावी असे आदेश दिले होते.
यावेळी मंत्री नितेश राणे साहेब यांनी सांगितले की, वर्सोवा कोस्टल रोड व भविष्यातील वाढवण पर्यंत होणारा कोस्टल रोड प्रकल्प एमएमआरडीए च्या माध्यमातून पूर्णत्वास येणार आहे. या पार्श्वभूमीवर या भागातील बाधित होणाऱ्या मच्छिमारांना योग्य नुकसानभरपाई मिळावी यासाठी विशेष अभ्यासगट स्थापन करून महिन्याभरात त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश यावेळी मंत्री नितेश राणे साहेब यांनी अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीस माजी आमदार श्री. किरण पावसकर साहेब, मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन रामास्वामी, एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी, संबंधित विभागांचे अधिकारी तसेच श्री. दिनकर तांडेल (महीकवती सोसायटी), श्री. दिलीप पागधरे ( माहीम विविध सोसायटी) श्री जयेश तांडेल (माहीम नाखवा सोसायटी) श्री. सचिन लिमन असे मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.मंत्री नितेश राणे साहेब यांनी कोणत्याही मच्छीमारांचे आम्ही नुकसान होऊन देणार नाही असे आश्वासन दिले. म्हणून सर्व मच्छीमार सोसायटीच्या प्रतिनिधीने व किरण पावसकर यांनी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री.नितेश राणे साहेब यांचे मनापासून आभार मानले.




