सातारा(नितीन गायकवाड) : महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखली येथील विद्यार्थीनी स्वरा मंगेश सुर्वे हिने नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत नवोदय विद्यालय, खावली (जि. सातारा) येथे प्रवेश मिळवला आहे. स्वराने ९७.५० गुण मिळवत महाबळेश्वर तालुक्यातून जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे.
स्वरा सुर्वे हिने यापूर्वीही विविध स्पर्धा परीक्षांमध्ये चमकदार कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. तिच्या या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक विष्णू ढेबे, उपशिक्षक महेश पवार व सचिन जगताप यांचे मार्गदर्शन तसेच पालक मंगेश सुर्वे यांचे पाठबळ महत्त्वाचे ठरले.
या यशाबद्दल गटविकास अधिकारी विजय विभुते, गटशिक्षणाधिकारी रमेश गंबरे, केंद्रप्रमुख चंद्रकांत जंगम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा लता जाधव, उपाध्यक्ष संतोष मोरे तसेच संपत जाधव, संतोष जाधव, विशाल पवार आणि ग्रामस्थ मंडळ चिखली व महाबळेश्वर तालुक्यातील शिक्षकवृंद यांनी स्वराचे अभिनंदन केले आहे.




