प्रतिनिधी : लोकसभा निवडणूक २०२४ ही सात टप्प्यात आणि सुमारे दीड महिन्याच्या कालावधीत घेण्यात आली. या मुद्द्यावरून अनेक पक्षांनी शंका उपस्थित केल्या होत्या. तसेच या कालावधीत देशातील वाढत्या तापमानाकडेही लक्ष वेधण्यात आले होते. आता मंगळवारी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. मतमोजणीच्या एक दिवस आधी केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्यांवर मत व्यक्त केले. तसेच निवडणुकीत झालेल्या चुकीची कबुलीही आयोगाने दिली आहे.
यंदाच्या निवडणुकीत मतदार आणि राजकीय नेत्यांना उन्हाचा त्रास सहन करावा लागला. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी 7 मे 2024 ला सैफईमध्ये झालेल्या मतदानावेळी आरोप केले होते. भाजपवाले मुद्दाम उन्हाच्या तडाख्यात मतदान करायला लावत आहेत, असे ते म्हणाले होते. तसेच कडक उन्हात जे मतदान होत आहे ते एक महिन्यापूर्वी देखील घेता आले असते, असे अखिलेश यादव यांनी म्हटले होते.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी अखिलेश यादव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नालाही उत्तर दिले. निवडणूक एक महिन्यापूर्वी संपवायला हवी होती, एवढ्या कडक उन्हात मतदान घ्यायला नको होते, हा आम्हाला मिळालेला पहिला धडा आहे, असे राजीव कुमार म्हणाले. आम्ही 642 मिलियन मतदानाचा जागतिक विक्रम केला आहे. हा जी-7 देशांच्या मतदारांच्या दीड पट आहे. यूरोपियन यूनियनच्या 27 देशांच्या अडीच पट मतदान आपल्या देशात झाले आहे, असेही राजीव कुमार म्हणाले.