ताज्या बातम्या

कोपरखैरनेत चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळला; ८ विद्यार्थी व शिक्षिका थोडक्यात बचावले

नवी मुंबई(ओमकार धुळप) :

नवी मुंबईतील कोपरखैरने सेक्टर–२ परिसरात गुरुवारी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास एका चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली. विद्याभवन नावाच्या या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅब तळमजल्यावर कोसळल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, तळमजल्यावर खाजगी क्लासेस सुरू असताना अचानक स्लॅब कोसळला. त्या वेळी क्लासमध्ये एक महिला शिक्षिका आणि आठ विद्यार्थी उपस्थित होते. स्लॅब कोसळल्यामुळे काही काळ हे सर्वजण ढिगाऱ्याखाली अडकले होते.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व स्थानिक प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. बचाव पथकाने तत्परतेने ढिगारा हटवून सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळवले. या घटनेत एका विद्यार्थ्याच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली असून उर्वरित विद्यार्थी व शिक्षिका सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे.
घटनास्थळी पाहणी केल्यानंतर अग्निशमन दलाने रेस्क्यू ऑपरेशन थांबवले असून इमारतीच्या सुरक्षिततेबाबत पुढील तपास सुरू आहे. याबाबत मुख्य अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांनी माहिती दिली.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top