मुंबई : धर्मरक्षक युवा हिंदुत्व यांच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.०० वाजता धारावी कोळीवाडा, होळी मैदान (मुंबई-१७) येथे भव्य शिवजयंती उत्सव व मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. “एक रोडा, एक उत्सव” या संकल्पनेतून साजरा होणारा हा कार्यक्रम कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा नेत्याचा झेंडा न ठेवता, केवळ स्वराज्याचा ध्वज आणि शिवप्रेम यासाठी समर्पित असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
या उत्सवाचे खास आकर्षण म्हणजे फोटोग्राफी स्पर्धा आणि सिनेमॅटिक रिल्स स्पर्धा. विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच पारंपारिक शिवकालीन वेशभूषा साकारणाऱ्या सहभागींसाठी आकर्षक पारितोषिकांचीही घोषणा करण्यात आली आहे.
कार्यक्रमाची रुपरेषा पुढीलप्रमाणे —
सायं. ५.०० वा. स्वराज्याचे घोडदळ आगमन व छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना
सायं. ५.१५ वा. वारकरी दिंडी व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार
सायं. ६.०० वा. लेझीम नृत्य, ढोल पथक सादरीकरण तसेच गडकिल्ले रक्षक व स्वच्छतेच्या शिलेदारांचा सन्मान
सायं. ६.३० वा. मर्दानी खेळ, संबळ-हलगी व पारंपारिक वादनाने शोभायात्रेला प्रारंभ
रात्री १०.०० वा. दांडपट्टा, तलवारबाजी सादरीकरणानंतर शोभायात्रेची सांगता
शिवकालीन वेशभूषा दिंडी, लाठी-काठी, मैदानी खेळ, संबळ, हलगी, तलवारबाजी, दांडपट्टा, लेझीम अशा विविध पारंपारिक कलागुणांचे सादरीकरण तसेच जागोजागी रांगोळीचे आयोजन करण्यात आले आहे.
“हिंदुत्व जपत असताना मराठी भाषा आणि संस्कृती दूर होता कामा नये; शिवरायांचे हिंदुत्व हे सर्वसमावेशक आणि संस्कृतीरक्षक होते,” असा संदेश देत सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन धर्मरक्षक युवा हिंदुत्व संघटनेने केले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन एम. दातार कन्स्ट्रक्शन व श्री. सिद्धिविनायक इंटरप्रायझेस यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे.




