Lमुंबई : समाजातील स्नेह-सलोखा वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने आजच्या युवापिढीने समाजाच्या कार्यात अधिकाधिक पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. वधू-वर सूचक मंडळाचे काम केवळ आपल्या ज्ञातीपुरतेच मर्यादित न ठेवता सर्वजातीय वधू-वरांचा समावेश करुन या क्षेत्रात व्यापक कार्य करण्याचा मानस चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज, बोरीवलीचे अध्यक्ष राजाभाऊ खोपकर यांनी व्यक्त केला. बोरीवली येथील चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजातर्फे सालाबादप्रमाणे वार्षिक स्नेहसंमेलन ज्येष्ठालय सभागृह, बाभई, बोरीवली (पश्चिम) येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. यावेळी अध्यक्षस्थानावरुन राजाभाऊ खोपकर बोलत होते. या वार्षिक स्नेहसंमेलनात वित्तीय गुंतवणूक सल्लागार श्री. विनायक देशमुख यांचे व्याख्यान, ज्ञातीतील कलाकारांचा ‘गीतों का कारवाँ’ हा सुमधुर गीतांचा कार्यक्रम तसेच विशेष गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार, ज्ञातीतील ज्येष्ठ बंधु-भगिनींचा सत्कार आणि कला, क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या व्यक्तींचा सत्कार अशा कार्यक्रमांचा मुख्यत्वे समावेश होता. संस्थेचे कार्यवाह श्री. उदय मथुरे यांनी आभारप्रदर्शन केले.*




