ताज्या बातम्या

लोकसभेत सत्ताधाऱ्यांचा पक्षपात; राहुल गांधींचा माईक बंद, निशिकांत दुबेंना मोकळीक – वर्षा गायकवाडांचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : लोकसभेतील कामकाज बंद पाडण्यात सत्ताधारी पक्षच आघाडीवर असून विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, त्यांचे मायक्रोफोन बंद केले जातात, असा गंभीर आरोप काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे. सत्ताधाऱ्यांसाठी वेगळे आणि विरोधकांसाठी वेगळे नियम लावले जात असल्याचे चित्र सध्या लोकसभेत दिसत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
संसदेतील कामकाजावर प्रसार माध्यमांशी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, विरोधी पक्षनेते राहुल गांधी बोलत असताना लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला सातत्याने त्यांना रोखत होते आणि त्यांचा मायक्रोफोन बंद केला जात होता. मात्र भाजप खासदार निशिकांत दुबे बोलत असताना त्यांना थांबवले गेले नाही. दुबेंनी शिष्टाचाराच्या सर्व मर्यादा ओलांडून वक्तव्य केले, तरीही लोकसभाध्यक्षांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. हे वर्तन स्पष्टपणे पक्षपाती असून लोकशाहीची हत्या करणारे आहे, असा आरोपही त्यांनी केला.
वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरली. मात्र यावर लोकसभाध्यक्षांनी कोणतीही कारवाई केली नाही. मी आणि माझ्या काही सहकारी महिला खासदारांनी दुबेंना जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी उत्तर देण्याऐवजी तेथून पळ काढला. संसदेत महिलांच्या सन्मानाचा आणि संसदेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असताना नियम सर्वांसाठी समान असले पाहिजेत, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
निशिकांत दुबे यांनी पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्याबाबत वापरलेल्या भाषेबद्दल त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणीही वर्षा गायकवाड यांनी केली. संसदेत विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष दोन्ही समान व तितकेच महत्त्वाचे आहेत. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून लोकसभेत पद्धतशीरपणे एक खेळ सुरू आहे. भाजप खासदार बोलताना त्यांचा मायक्रोफोन नेहमी चालू असतो, पण विरोधक बोलताच मायक्रोफोन बंद केला जातो, असा आरोप त्यांनी केला.
या संदर्भात आम्ही हा मुद्दा उपस्थित करून कारवाईची मागणी केली. आम्हाला दुपारी ४ वाजता भेटीची वेळ देण्यात आली. आम्ही वेळेत पोहोचलो, मात्र कोणताही तोडगा निघाला नाही. नंतर सायंकाळी ५ वाजेपर्यंत तोडगा काढला जाईल असे सांगण्यात आले, पण तरीही काहीच झाले नाही, असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
काँग्रेस नेत्यांबद्दल किंवा त्यांच्या नेत्यांविरोधात कोणीही अपशब्द वापरत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशाराही खासदार वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिला.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top