कराड(प्रताप भणगे) : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पाचवड फाटा ते येळगाव फाटा दरम्यान नांदगाव गावच्या हद्दीत सुरू असलेल्या पुलाच्या कामावर बालकामगारांचा वापर होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. मार्ग प्रकल्प विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील या पुलावरील लोखंडी संरचनेला रंगकाम (कलर) करत असताना लहान मुलांकडून काम करून घेतले जात असल्याचे दिसून येत आहे.
बालकामगार प्रतिबंधक व नियमन कायद्यानुसार बालकामगारांकडून काम करून घेणे हा दंडनीय गुन्हा असतानाही संबंधित विभागांकडून या गंभीर बाबीकडे कानाडोळा केला जात असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे शिक्षणाच्या वयात असलेली ही मुले कामावर राबत असल्याने त्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या वयात मुलांना शिक्षण, संस्कार व सुरक्षित वातावरणाची गरज असताना सार्वजनिक कामांवर त्यांचा वापर होणे ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. संबंधित ठेकेदारांवर तात्काळ कारवाई करून बालकामगारांना कामातून मुक्त करावे तसेच त्यांच्या शिक्षणाची योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या प्रकरणाकडे मार्ग प्रकल्प विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ लक्ष देऊन कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.




